औरंगाबाद : तुम्ही दिलेले महाशिवआघाडी हे नाव असो किंवा युती, शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्य आहे. सेनेला बरोबर घेतल्याशिवाय कोणालाच सत्तेत जाता येणार नाही. सगळ्यांनी सगळीकडे काम करून चालत नाही. ते तिकडे लढत आहेत, पण तानाजीशिवाय शेलारमामाला किंमत नसते, अशा ऐतिहासिक उपमा देत खासदार संजय राऊत यांचे दिवाकर रावते यांनी कौतुक केले. शिवसेनेने अतिवृष्टीतील शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी केलेल्या मदत केंद्राच्या पाहणीसाठी ते औरंगाबाद जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर होते. तीन मतदार संघात भेटी दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, या विधानाचा त्यांनी पुनरुच्चार केला.

खासदार संजय राऊत यांना एक काम दिले आहे. सगळ्यांनी सगळीकडे जाऊन लढाया खेळायच्या नसतात, असे म्हणत शिवसेनेचे वरिष्ठ नेते राजकीय प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळतात का, यावर भाष्य केले. या पत्रकार बैठकीस आमदार अंबादास दानवे यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांसाठी मोठय़ा गावांमध्ये मदत केंद्र

शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे तातडीने मदत मिळण्याची गरज आहे. तातडीच्या मदतीसाठी प्रशासनाला सहकार्य व्हावे आणि माहिती एकत्रित व्हावी म्हणून शिवसेनेने मोठय़ा गावांमध्ये मदत केंद्र सुरू केले आहे. या मदत केंद्रांमधून शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी पुढे येत आहे. पूर्वी जाहीर केलेल्या कर्जमाफीतील त्रुटी दूर करून ज्यांना कर्जमाफी मिळणे शक्य आहे, त्यांना ती मदत शिवसेनेकडून केली जाईल. मात्र, संपूर्ण कर्जमुक्तीची शिवसेनेची घोषणा पूर्ण होण्यासाठी सत्ता स्थापन करायची असेल, तर शिवसेनेशिवाय ते शक्य नाही. मग सत्तेत महाशिवआघाडी असो की युती, असे म्हणत त्यांनी युतीची दारे पूर्णत: बंद झाली नसल्याचे संकेत औरंगाबाद येथे दिले.