विधान परिषदेसाठी १९ ऑगस्टला मतदान

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली असून १९ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे सुभाष झांबड विजयी झाले होते. त्यांची मुदत २९ ऑगस्टपर्यंत असल्याने तत्पूर्वी निवडणूक घेणे आवश्यक आहे. आज निवडणुकीच कार्यक्रम जाहीर करण्यात आला. गेल्या पाच वर्षांत मोठय़ा राजकीय उलथापालथी झाल्यामुळे या दोन जिल्ह्य़ांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप-सेना युतीचे वर्चस्व आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीची चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू झाली असली तरी राजकीय पक्षात अद्यापि सामसूमच आहे. विशेषत: काँग्रेसमध्ये या निवडणुकीच्या अनुषंगाने कोणतीही चर्चा अद्यापि झालेली नाही. या मतदारसंघात ६५६ मतदार आहेत.

विधान परिषदेची ही जागा युतीमध्ये शिवसेनेच्या वाटय़ाची आहे. गेल्या वेळी या मतदारसंघात किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेकडून नशीब अजमावले होते. नंतर तनवाणी भाजपमध्ये दाखल झाले. आता शिवसेनेचा उमेदवार कोण, याची उत्सुकता आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अद्यापि उमेदवारीबाबत पक्षप्रमुखांशी चर्चा झाली नसल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य या निवडणुकीत मतदान करतात.

शिवसेनेत उमेदवारीवरून संभ्रम

औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांची सत्ता आहे. भाजप हा मोठा पक्ष असला तरी त्याला रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसबरोबर आघाडी केली होती. युतीतील वरिष्ठांमधील मतभेद जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील ही युती तोडावी, अशी मागणी भाजपकडून केली गेली. मात्र, त्यावर शिवसेनेने निर्णय घेतलेला नाही.

सध्या शिवसेनेच्या देवयानी डोणगावकर या अध्यक्षा आहेत, तर काँग्रेसचे केशवराव तायडे उपाध्यक्ष आहेत. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचे काँग्रेसमधील समर्थक जिल्हा परिषदेत पदाधिकारी आहेत. सध्या सत्तार यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. अलीकडेच त्यांनी भाजप आणि सेना नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. जालना जिल्हा परिषदेमध्येही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे बंधू अनिरुद्ध खोतकर हे अध्यक्ष आहेत, तर माजी मंत्री राजेश टोपे यांचे बंधू सतीश टोपे उपाध्यक्ष आहेत. औरंगाबाद महापालिकेत भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे. सेना-भाजपामधील संबंध ताणलेले असतात. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाने व्हिप बजावला तरी मतदानाच्या वेळी कोण कोणाला मतदान करेल, हे सांगता येत नाही. त्यामुळेच सेनेत उमेदवारीवरून संभ्रम आहे.

मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील यांच्या नावाची चर्चा शिवसेनेत सुरू आहे. ते अलीकडेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध असल्याने त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा शिवसेनेत आहे.

विनोद पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आर. आर. पाटील यांचे कट्टर समर्थक होते. या अनुषंगाने विनोद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, अशा प्रकारची कोणतीही चर्चा आपल्यापर्यंत आली नाही, असे ते म्हणाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांचेही नाव या निवडणुकीसाठी चर्चेत आणले जात आहे. मात्र, या उमेदवारीवरून सेनेत संभ्रम आहे.

काँग्रेसमध्येही सामसूम : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलल्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने नव्याने रणनीती आखली जाऊ शकते काय, याची चाचपणी केली जात आहे. मात्र, निवडणुकीत उमेदवारीसाठी फारसे कोणी इच्छुक नाही. पक्षाने अद्याप मला कोणतेही आदेश दिलेले नाही, असे सुभाष झांबड यांनी सांगितले होते.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

* उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख- १ ऑगस्ट २०१९

* नामनिर्देशन पत्राची छाननी- २ ऑगस्ट

*उमेदवारी मागे घेण्याची मुदत- ५ ऑगस्ट

* मतदान- १९ ऑगस्ट, वेळ- सकाळी ८ ते दुपारी ४

* मतमोजणी- २२ ऑगस्ट