News Flash

सत्ता सारीपाटात भाजप हरली, सेना जिंकली

मराठवाडय़ात यंदा भाजपने शिवसेनेला मागे टाकत यश मिळविले.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मराठवाडय़ात यंदा भाजपने शिवसेनेला मागे टाकत यश मिळविले. यातूनच भाजपची कोंडी करण्यासाठी शिवसेनेने थेट राष्ट्रवादी व काँग्रेसशी हातमिळवणी करीत भाजपला धडा शिकविला. मग उस्मानाबाद आणि परभणीत शिवसेनेला शह देण्याकरिता राष्ट्रवादीशी संधान साधले. मराठवाडय़ातील या साऱ्याच राजकीय गोंधळात भाजप हरली तर शिवसेना जिंकली, असेच वर्णन करता येईल.

जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घसरणीला लागलेल्या शिवसेनेला तडजोडीमध्ये मागे टाकता न आल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना जालना जिल्हय़ात फटका बसला. सत्ता असूनही विरोधकांमधील एकाही पक्षाला त्यांना सोबत घेता आले नाही. परिणामी औरंगाबाद आणि जालना जिल्हय़ात भाजपचे सदस्य अधिक असूनही त्यांना सत्ता मिळवता आली नाही.

दुसरीकडे राष्ट्रवादीतील सुरेश धस यांना फोडून भाजपने धनंजय मुंडेंवर कुरघोडी केली. या निवडणुकीमुळे कोणते आमदार फुटू शकतात, याची भाजपची चाचपणी मात्र पूर्ण झाली असल्याचे चित्र दिसत आहे. अपक्ष आमदार मोहन फड यांनी शिवसेना सोडली आहे. धस यांनी त्यांचा गट भाजपच्या मागे उभा केल्याने ते सुद्धा भाजपच्या गळाला लागू शकतात.  मात्र, राष्ट्रवादीतील नेते धस यांची त्यांच्या मतदारसंघातही ताकद राहिली नसल्याचे सांगत आहेत. त्यासाठी त्यांच्या पत्नीचा पराभव आवर्जून सांगितला जात आहे.

मराठवाडय़ातील आठ जिल्हा परिषदेमधील पक्षीय बलाबलाची बेरीज आणि सत्तेची खिचडी याचे चित्रही मोठे गमतीदार आहे. भाजपचे सर्वाधिक १३३ , राष्ट्रवादी काँग्रेसचे ११७, काँग्रेसचे ९८ तर शिवसेनेचे ८६ जिल्हा परिषद सदस्य आहेत. ज्या दोन जिल्हय़ात कुरघोडीने भाजपचा पराभव झाला तेथे शिवसेना-काँग्रेसची आघाडी झाली आहे. परिणामी जालना आणि औरंगाबादमध्ये दोन जिल्हय़ाच्या राजकारणाचा पोत बदलण्याची शक्यता आहे. औरंगाबादमधील निवडणुकांमध्ये धर्माच्या आधारे ध्रुवीकरण घडवून आणले जाते. आता काँग्रेसबरोबर सेनेने आघाडी केल्यामुळे आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी त्याच त्वेषाने केली जाणार का, असा सवाल भाजपचे नेते विचारत आहेत. सेनेने कुरघोडी करून पदे मिळवताना हिंदूंची मते काँग्रेसला मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करून दिला असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. या निवडणुकीचा परिणाम लोकसभा व विधानसभा निवडणुकीवरही आगामी काळात होऊ शकतो, असेही सांगितले जाते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातील मतदारांचा कौल जरी भाजपच्या बाजूला असला तरी सत्तेच्या सारीपाटात मराठवाडय़ात भाजप हरली आहे.

विचित्र युती

हिंगोलीमध्ये सेनेची पूर्वी एकहाती सत्ता होती. तेथे भाजपाला रोखण्यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी आणि सेना पुन्हा एकत्र आली. त्यामुळे या पुढे कोणत्याही निवडणुकीमध्ये शिवसेनेबरोबर युती करणार नाही, असा इशारा आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिला आहे. राष्ट्रवादीतील एक नेता म्हणाला, पूर्वी आमच्याच पक्षातील काही नेत्यांबरोबर मैत्री असायची. आता कोणत्याही पक्षात गेला तरी पूर्वाश्रमीचा एक राष्ट्रवादीचा नेता सापडतो. पक्षाला लागलेली गळती चिंताजनक आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेवर अध्यक्षपदी विराजमान झालेल्या देवयानी डोणगावकर यांचे सासरे अशोक पाटील डोणगावकर शरद पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील डोणगावकर यांनी निवडणुकीपूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. सत्तेसाठी सर्वकाही करणाऱ्या नेत्यांनी केलेल्या या आघाडय़ांच्या अनुषंगाने बोलताना राजकीय विश्लेषक पत्रकार जयदेव डोळे म्हणले, ‘आता एखादे दुकान टाकावे किंवा उद्योग टाकावा, असे राजकारणाचे स्वरुप झाले आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2017 1:31 am

Web Title: shiv sena vs bjp in aurangabad 2
Next Stories
1 स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधकांना पैसे पुरवले
2 मराठवाडय़ात सत्तेसाठी सोईची मैत्री
3 अल्पसंख्याक शाळांच्या अनुदान वाटपात पूर्व विदर्भाचा टक्का घसरला
Just Now!
X