औरंगाबाद जिल्ह्यातील रस्त्यावरील खड्ड्यां संदर्भात भाजपविरोधातील शिवसेनेनं पुकारलेलं आंदोलन सपशेल अपयशी ठरले. नियोजनाचा अभाव, उत्साहाची कमतरता, कार्यकर्त्यांची मोजकी संख्या यामुळे शिवसेनेचं आंदोलन म्हणजे सोपस्कार पार पाडण्या पुरतेच होते, अशी चर्चा देखील परिसरात रंगत आहे. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. जिल्ह्यातील प्रमुख महामार्गावर पडलेल्या खड्डयांविरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील कोकणवाडी येथून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजित होते. जिल्ह्यातील शिवसैनिकांना त्यासाठी सकाळी साडेदहाची वेळ देण्यात आली होती. मात्र, साडेअकरा झाले तरी म्हणावी अशी गर्दी जमली नाही.

त्यामुळे अंबादास दानवे यांना कार्यकर्त्यांची वाट पाहत थांबावे लागले. आंदोलनासाठी जमलेली अल्प गर्दी सेल्फी काढण्यात गुंग झाल्याचेही पाहायला मिळाले. कार्यकर्त्याची संख्या वाढण्याची चिन्हं दिसल्याने सव्वाबाराच्या सुमारास मोजक्या शिवसैनिकांच्या उपस्थित आंदोलनाला सुरुवात झाली. शिवसेनेच्या नेत्यांनी देखील या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसले. खासदार चंद्रकांत खैरे, चार दिवसांपूर्वी मतदारसंघातील रस्त्याच्या प्रश्नावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ‘बाण’ सोडणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आंदोलनात सहभागी होण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे शिवसेनेत अंतर्गत ‘खड्डे’ पडलेत काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.

आंदोलनात सहभागी न झालेल्या खैरै यांनी यासंदर्भात भूमिका मांडताना सांगितले की, खड्ड्यांच्या संदर्भातील मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे. २४ तारखेला यासंदर्भात बैठक बोलवण्यात आली आहे. जनतेच्या प्रश्नावर पक्षाने आंदोलक करायलाच हवं. या आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंदर्भातील आढावा घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील राज्यमार्ग आणि प्रमुख महामार्ग यांची खड्ड्यामुळे प्रचंड दुरवस्था झाली आहे. या खड्डयामुळे मोठ्या त्रासाला समोर जावं लागतं आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेनं औरंगाबादमध्ये जास्त खड्डे आहेत. शिवसेनेचं वर्चस्व असल्यामुळे खड्डे बुजवले जात नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करत तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेनेच्या आंदोलनानंतर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या रस्त्याचं काय ? त्यावरील खड्डे कधी बुजणार असा प्रश्न देखील चर्चेचा विषय ठरत आहे.