औरंगाबाद जिल्ह्य़ात सेनेचे पाच आमदार आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ात तीन आमदार. पण मराठवाडय़ातील लातूर, बीड, जालना येथे ताकद तशी शून्यावर. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्य़ात प्रत्येकी एक मतदारसंघात शिवसेनेला ताकद दाखवता आली. पण आता सत्तेचे सर्वोच्च पद मिळाल्यानंतर त्याचा वाटा मिळेल का, या शक्य-अशक्यतेच्या खेळात सध्या मराठवाडय़ातील शिवसेना अडकली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सेनेतील प्रमुख नेत्यांनी शपथ घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेत स्थान मिळाले. त्यात मराठवाडा कोठेच दिसला नाही, असे भाजपचे काही कार्यकर्ते आवर्जून सांगत होते. सेनेची ताकद २०१४ पेक्षा काहीशी वाढली असली तरी सत्तेतला वाटा मिळणार की नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेले आमदार संजय शिरसाट यांनी तिसऱ्यांदा विजय मिळविला, तर पैठण मतदारसंघातून संदीपान भुमरे पाच वेळा निवडून आले आहेत. प्रतिष्ठेच्या केलेल्या कन्नड मतदारसंघातून नशीब अजमावून पाहणाऱ्या उदयसिंह राजपूत यांना पहिल्यांदाच आमदार होता आले. तर वैजापूर मतदारसंघातून प्रा. रमेश बोरनारे यांनीही विजय मिळविला आहे. सर्वाधिक काळ सलग निवडून येण्याचा निकष लावला तर उमरगा मतदारसंघाचे ज्ञानराज चौगुले यांनाही सत्तेत वाटा मिळू शकेल, असे सांगण्यात येते.

दुसरीकडे काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत असणाऱ्या अब्दुल सत्तार यांना सेनेची उमेदवारी मिळवता आली, ती भाजपची रणनीती होती. पण सत्तार यांचे साधले गेले. ते निवडून आले आणि त्यांचा वावर जणू वर्षांनुवर्षे ते शिवसेनेत आहेत, असेच दाखवणारा असल्याने काही शिवसैनिक त्याकडे आवर्जून लक्ष वेधत आहेत. केवळ दूरचित्रवाणीवरील पत्रकारांसमोर वक्तव्य केले म्हणजे सत्तेत वाटा मिळेल का, असा सवालही केला जात आहे. मात्र, अल्पसंख्याक असल्याच्या प्रतिमेचा फायदा होईल असा दावा सत्तार यांचे समर्थक करत आहेत. पक्ष संघटना बांधणीत अग्रेसर असणाऱ्या विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांच्या समर्थकांनाही त्यांना सत्तेत वाटा मिळेल, असे वाटते आहे.

सलग निवडून येण्याच्या निकषाऐवजी सत्ताधारी म्हणून उत्तर देण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तींना स्थान मिळावे अशी मागणी परभणी जिल्ह्य़ातून होत आहे. डॉ. राहुल पाटील येथील आमदार आहेत. सत्तेतला वाटा आपल्या पदरी पडावा म्हणून वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत राहता यावे, असे प्रयत्न आमदारांकडून मुंबईत सुरू असल्याचे सांगण्यात येते.

काँग्रेस-राष्ट्रवादी नेतेही प्रयत्नशील

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेतेही सत्तेतला वाटा मिळेल का, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातही नांदेड आणि लातूर जिल्ह्य़ात काँग्रेसच्या नेत्यांना सत्तेतल्या वाटय़ाची आस आहे. त्यात अमित देशमुख यांचे नावही चर्चेत आणले जात आहे. तर नांदेड जिल्ह्य़ात अशोक चव्हाण यांना सत्तेची ताकद दिली तर मराठवाडय़ात पक्षविस्तार अधिक वाढू शकतो, असा दावा त्यांचेही समर्थक करत आहेत. त्यामुळे सत्तेतल्या वाटय़ासाठी आता शिवसेनेचे नेते भेटीगाठी करत आहेत.