माजी मुख्यमंत्री निलंगेकर यांचे मत

सोनिया गांधींचे चुकीचे सल्लागार असल्यामुळे काँग्रेसचे नुकसान होत असून आजही त्यांचे सल्लागार चुकीचेच असल्याचे आपले स्पष्ट मत असल्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी पत्रकार बैठकीमध्ये सांगितले. प्राचार्य जगन्नाथ पाटील यांची या वेळी उपस्थिती होती.

निलंगेकर म्हणाले, सध्याच्या मोदी सरकारमध्ये हुकूमशाहीचा कारभार आहे. अडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा ज्येष्ठांना कोणी विचारत नाही. मात्र, काँग्रेसमधील ज्येष्ठांचा विचार घेतला जातो हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका करत सामान्य माणसांच्या प्रश्नासाठी आवाज उठवत जे सत्तेवर आले त्या मंडळींनी आज सामान्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक केली आहे याबद्दलही त्यांनी टीका केली.

वयाच्या ८७ व्या वर्षी आपली तब्येत उत्तम आहे व अजूनही आपल्याला लोक त्यांचे प्रश्न घेऊन भेटायला येतात व माझ्या परीने मी लोकांचे प्रश्न सोडवायला मदत करतो असे ते म्हणाले.

वैभव तेरणेचे आत्मचरित्र आपण लिहित असून वयाच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त ते प्रकाशित करण्याचा आपला मानस असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे आपले नातू आहेत. त्यांचा कारभार कसा सुरू आहे, या विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. त्यांचा पक्ष वेगळा व माझा पक्ष वेगळा.

माझ्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवलेली असल्यामुळे नात्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो अशी पुस्तीही त्यांनी जोडली. लातूरच्या मंडळींनी निवडणुकीत रसद पुरवल्यामुळे आपल्याला थोडक्या मताने पराभवाला सामोरे जावे लागले होते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.