15 December 2018

News Flash

शेतकऱ्यांना प्रबोधनातून आत्मबल देणारा ‘विनायक’

शेतकऱ्यांच्या आत्महत्येने विनायक हेगाणा हा अवघ्या एकवीस वर्षांचा तरुण अस्वस्थ झाला.

दीड वर्षांत शिवार संसदचे तीन हजार सहकारी

शेतकऱ्यांच्या आत्महत्येने विनायक हेगाणा हा अवघ्या एकवीस वर्षांचा तरुण अस्वस्थ झाला. ऐन तारुण्यातील अवखळ मस्तीच्या वयात आत्महत्या कशा रोखता येतील याचा विचार करू लागला. घरची परिस्थिती बेताची, उत्पन्नाचे साधनही नाही. अनेकांकडे खेटे मारूनही अपेक्षाभंग झाला. तरी हतबल न होता ‘शिवार संसद’ ही संस्था स्थापन करून गावागावांत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी त्याने महाराष्ट्र पालथा केला. दीड वर्षांत आता तीन हजार सहकाऱ्यांच्या माध्यमातून विनायकने शेतकऱ्यांना मानसिक आधार देत कठीण परिस्थितीतही संघर्ष करण्याचे बळ देऊ लागला आहे.

बीड जिल्ह्णाात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढल्याने अनेक जण कठीण परिस्थितीतील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. विनायक चंद्रकांत हेगाणा (रा.अर्जुनवाड, ता. शिरोळ, जि.कोल्हापूर) हा अवघ्या २१ वर्षांचा तरुण दोन आठवडय़ापूर्वी पाली, कुर्ला या गावांतील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांचे प्रबोधन करू लागला. शासनाच्या योजनांची माहिती देत रोजगारनिर्मितीचे स्रोत सांगून आíथक अडचणीत असलेल्या कुटुंबांना जगण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल अशा पद्धतीने त्याने प्रबोधन केले.

दीड वर्षांत तीन हजार सहकारी तयार करून आता विनायकने ही चळवळ शिवार संसदच्या नावाने गावागावांत पोहोचवली आहे. शेतकरी कुटुंबातला जन्म असल्याने लहानपणापासूनच शेतकऱ्यांचे प्रश्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. आत्महत्येच्या वृत्ताने तर त्याला अधिकच अस्वस्थ केले. पण घरची परिस्थिती बेताची. स्वत:कडे उत्पन्नाचे साधन नाही. करायचे काय? असा विचार असला तरी कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी काम करत त्यांना आत्महत्येच्या विचारापासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या विचाराने त्याची झोप उडवली. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठीचा एक प्रस्ताव घेऊन विनायकने सरपंचापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वाना भेटून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच पदरी पडले नाही. पण हताश न होता विनायकने आहे त्या परिस्थितीत बिनपशाचा खटाटोप सुरू केला. सुरुवातीला अनेक गावांत जाऊन विनायकने शिवार संसदच्या नावाखाली प्रबोधन सुरू केले. त्याच्या या तळमळीला त्याच्या वयातील तरुणांनी साथ देण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता जवळपास तीन हजार सहकाऱ्यांचा एक समूहच तयार झाला. सकाळी उठून एसटी बससह मिळेल त्या वाहनाने गावात जायचे. शेतकऱ्यांशी थेट चर्चा करत त्यांची परिस्थिती जाणून घेत त्यावर मार्ग काढण्याचे प्रबोधन करायचे हे काम आता नित्याचे झाले आहे.

सांगली, बीड, जालना, वर्धा, अमरावती, उस्मानाबाद, यवतमाळ, सोलापूर या जिल्ह्णाांत प्रामुख्याने प्रबोधन करून विनायकने शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. आर्वी येथील शांतिवन प्रकल्पातून शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे सांगताना डॉ. सुनीलकुमार लवटे, दीपक नागरगोजे, सुरेश राजहंस यांच्या पाठबळामुळे आपण हे काम करत असल्याचे विनायक सांगतो.

First Published on May 25, 2016 1:50 am

Web Title: shivar sansad establishment