औरंगाबाद महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे नंदकुमार घोडेले ७७ मतं मिळवून विजयी झाले. यापूर्वी नंदकुमार घोडेले यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनी देखील महापौरपदी काम केले आहे. त्यांच्यानंतर दुसऱ्यांदा घोडेले घराण्याच्या वाट्याला महापौर पद आले आहे. आज महापालिका सभागृहात महापौरपदासाठीची मतदान प्रकिया पार पडली. यात घोडेले यांनी ‘एमआयएम’चे अब्दुल नाईकवाडे यांचा पराभव केला.

अब्दुल नाईकवाडे यांना २५ मतं मिळाली, तर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला ११ मतांवर समाधान मानावे लागलं. महापौरपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर घोडेले म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं प्रस्तावित स्मारक, शहरातील रस्ते, पाणी पुरवठा व्यवस्था, स्वच्छता या गोष्टी माझ्यासाठी प्राधान्याच्या आहेत. यासंदर्भातील संकल्पनामा देखील त्यांनी प्रसिद्ध केला.

महानगरपालिकेतील पक्षीय संख्याबळ :
शिवसेना:२८
भाजप:२३
एमआयएम:२४
काँग्रेस:११
राष्ट्रवादी:४
इतर: १७
बीएसपी:५
आरपीआय: २