News Flash

विद्यार्थ्यांची बोगस नोंद करून फसवणूक

शहरातील खोकडपुरा भागातील शिवाजी कन्या प्रशालेत विद्यार्थ्यांच्या फक्त नोंदी घेतल्या जातात.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

शिवतेज विद्यामंदिरची परवानगी रद्द करण्याची शिफारस

शहरातील खोकडपुरा भागातील शिवाजी कन्या प्रशालेत विद्यार्थ्यांच्या फक्त नोंदी घेतल्या जातात. प्रत्यक्षात हे विद्यार्थी तिसगाव येथील ‘शिवतेज इंटरनॅशनल स्कूल’मध्ये शिक्षण घेतात. शाळा चालविण्यासाठी देण्यात आलेली परवानगी ज्या भाडे कराराच्या आधारे दिली आहे. त्या जागेवर शाळाच भरत नसल्याने शिवतेज विद्यामंदिर व उच्च माध्यमिक विद्यालय तिसगाव शाळेची परवानगी रद्द करण्याची शिफारस माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी उपसचिवांकडे केली आहे. देवेंद्र रामकृष्ण निर्मल यांनी या शाळेच्या अनुषंगाने शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे चौघाजणांनी केलेल्या चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

शिवतेज इंटरनॅशनल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला शाळा सोडल्याचा दाखला औरंगाबाद शहरातील खोकडपुरा भागातील शाळेचा मिळत असे. देवेंद्र रामकृष्ण निर्मल यांच्या मुलीचा दाखला याच पद्धतीने मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची माहिती मिळवायला सुरुवात केली. माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने दिल्यानंतर ए. सी. कापसे, जे. व्ही. चौरे, अनिल सकदेव हे तीन विस्तार अधिकारी आणि सहायक शिक्षण उपनिरीक्षक एम. आर. सोनवणे यांनी या शाळेची चौकशी केली. मुख्याध्यापक व संस्थाचालकांना प्रश्नावली भरून देण्यास सांगितले होते. अभ्यासाअंती शाळा सुरू असलेल्या जागेचा गट क्रमांक संदिग्धपणे लिहिल्याचे त्यांना दिसून आले.

शिवतेज इंटरनॅशनल स्कूल या शाळेत शिकणारे विद्यार्थी प्रत्यक्षात तिसगाव येथे विनाअनुदानित शाळेत शिकत असले तरी त्याच विद्यार्थ्यांची नोंद खोकडपुरा येथे अनुदानित शाळेत नोंदवली जात असल्याची कागदपत्रे चौकशी अधिकाऱ्यांना दिसून आली. खोकडपुरा भागातील शाळेच्या विद्यार्थ्यांची फक्त नोंद घेतली जाते. प्रत्यक्षात हे विद्यार्थी तीसगाव येथील शिवतेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत असल्याचे संस्थाचालक प्रकाश बाबुलाल परदेशी व मुख्याध्यापकांनी लेखी मान्य केल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. या आधारे शाळेची परवानगी रद्द करण्याचा निर्णय शिक्षण अधिकाऱ्यांनी घेतला आहे. अनुदानित शाळेतील विद्यार्थी खासगी शाळेत दाखवून त्यांच्याकडून भरमसाठ शुल्कही आकरण्यात आले. देवेंद्र निर्मल त्यामुळेच वैतागले होते. त्यांनी के लेल्या तक्रारीच्या पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 1:01 am

Web Title: shivtej vidya mandir school cheating by recording bogus students
Next Stories
1 पितृछत्र हरवलेल्या मुलीचा लोकसहभागातून पार पडला विवाह
2 औरंगाबादमधील कटकटगेट भागात तरुणाची आत्महत्या
3 ‘मानव विकास’मधून मराठवाडय़ात रोजगारवाढीचा प्रयत्न
Just Now!
X