25 January 2021

News Flash

औरंगाबादमध्ये ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा; कृत्रिम प्राणवायूचा पुरवठाही बेताचाच

नव्या दोन कंपन्यांकडून ‘ऑक्सिजन’ पुरवठय़ाचे करार

नव्या दोन कंपन्यांकडून ‘ऑक्सिजन’ पुरवठय़ाचे करार

औरंगाबाद : एका बाजूला औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असतानाच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठय़ावर आता परिणाम झाला आहे. दोन दिवसांपासून निर्माण झालेला तुटवडा सोमवारी सुरळीत होऊ शकतो, असे अन्न व औषधी विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. दरम्यान, कृत्रिम प्राणवायूचा पुरवठा अगदी हातघाईवर आला नसला तरी वाहतुकीमध्ये थोडा जरी अडथळा आला तरी त्याचे परिणाम होऊ शकतात. मागणी केलेला कृत्रिम प्राणवायू आणि इंजेक्शन शिल्लक उरत नसल्याने प्रशासनाच्या कसरतीचा काळ सुरू झाला आहे. दरम्यान ‘आयनॉक्स’ या एकमेव ‘ऑक्सिजन’ उत्पादन कंपनीबरोबरच आता ‘लिंडे’ व ‘जेएसडब्ल्यू’ या कंपन्यांकडूनही कृत्रिम प्राणवायू मागविण्यात आला आहे. मात्र, त्याच्या वाहतुकीसाठी लागणाऱ्या टँकरची समस्या प्रशासनासमोरची असल्याचे सांगण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी रात्री सहा हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

एका बाजूला रुग्णसंख्या तर वाढतेच आहे, शिवाय रुग्णांना कृत्रिम प्राणवायूची गरज भासण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामुळे औषधांचा वापरही वाढविला जात आहे. गेल्या दोन दिवसापासून रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या केवळ १६० कुप्या आल्या होत्या. तत्पूर्वी हे प्रमाण २४० एवढे होते. त्यामुळे इंजेक्शनची कमतरता भासत असल्याचे विविध रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येते. या अनुषंगाने अन्न व औषधी विभागाचे सहसंचालक संजय काळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले,की गेल्या दोन दिवसापासून उत्पादक कंपनीकडूनच पुरेसा पुरवठा होत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. सोमवापर्यंत हा पुरवठा सुरळीत होईल.

कृत्रिम प्राणवायूसाठी धावाधाव

औरंगाबाद शहरातील विविध रुग्णालयांची कृत्रिम प्राणवायूची गरज सध्या ४७ टन एवढी आहे. त्यातील खासगी रुग्णालयांना होणाऱ्या पुरवठय़ाचे करार असल्याने त्यांना तो सुरळीत आहे. मात्र, काही रुग्णालयांना मागणी आणि पुरवठा यातील तफावत भरुन काढताना धावाधाव करावी लागते. नव्याने ‘लिंडे’ कंपनीकडून होणारा ऑक्सिजन पुरवठा जालना, नांदेड आणि औरंगाबाद या शहरांसाठी होणार आहे. मात्र, पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडे टँकर नसल्यानेही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा आता डोळयात तेल घालून करावा लागत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2020 12:20 am

Web Title: shortage of remdesivir in aurangabad zws 70
Next Stories
1 १० लाख टन साखर उत्पादन कमी करण्याची व्यूहरचना
2 औरंगाबाद शहरात २५ टक्के घरे पडून
3  नाथसागरचे १२ दरवाजे दीड फुटांनी वर उचलले
Just Now!
X