स्वामी विष्णुपादानंदजी यांची माहिती

औरंगाबाद : सभ्य, सज्जन व चारित्र्यवान माणूस घडवायचे काम हे धर्माचे असते. मंदिर, प्रार्थनास्थळांमध्ये हे काम होत असते. मंदिर, प्रार्थनास्थळे हे मन शुद्ध करण्याची केंद्रे आहेत. श्रीरामकृष्ण मंदिरातील ध्यान केंद्रात आल्यानंतर माणूस अंतर्मुख होईल आणि त्याला स्वत्वाचा शोध घेण्याची प्रेरणा मिळेल, असे सांगत औरंगाबादच्या रामकृष्ण मिशन आश्रमाचे सचिव, प्रमुख स्वामी विष्णुपादानंदजी यांनी बीड बायपास वे वरील कमलनयन बजाज हॉस्पिटलच्यानजीक २८ कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या भव्य-दिव्य श्रीरामकृष्ण मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची माहिती दिली.

स्वामी विष्णुपादानंदजी म्हणाले, की १६ नोव्हेंबर रोजी ‘विवेकानंद-डे’ होणार आहे. यानिमित्त विवेकानंद यांच्यावरील नाटिका, जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात येणारे उपक्रम, ध्यान, मंगलारती, भजन, संकीर्तन आदी कार्यक्रम आहेत. १७ नोव्हेंबर रोजी नूतन मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातील मिशनच्या केंद्रातून ३५० साधू, स्वामिजी व ५ हजार गृहस्थाश्रमी येणार आहेत. त्यामध्ये पश्चिम बंगालमधील बेलूर येथील रामकृष्ण मठाचे ३ वरिष्ठ उपाध्यक्ष, स्वामी वागीशानंदजी महाराज, स्वामी गौतमानंदजी महाराज आणि स्वामी शिवमयानंदजी महाराज यांच्यासह मिशनचे सरचिटणीस स्वामी बलभद्रानंदजी महाराज यांची उपस्थिती राहणार आहे. महापौर नंदकुमार घोडेले हे औरंगाबादकरांचे प्रतिनिधी म्हणून मंचावर राहतील. शिवाय महिकोचे राजेंद्र बारवालेही उपस्थित राहणार असल्याचे स्वामीजींनी सांगितले. १८ नोव्हेंबरलाही विविध कार्यक्रम होणार आहेत. या तीन दिवसीय कार्यक्रमांत मान्यवरांची प्रवचनेही होणार असल्याचे ते म्हणाले.

रोमन, गॉथिक, इस्लामी स्थापत्य

स्वामी विवेकानंदांनी जगभरातील स्थापत्य शैलींचा अभ्यास केला आणि आपल्या संकल्पनेतील मंदिराला प. बंगालमधील बेलूर येथे मूर्त रुप दिले. रोमन शैलीतील कळस, गॉथिक आणि राजपूत शैलीतील घुमट, तर इस्लामी स्थापत्याचीही काही वैष्ट्येि या बांधकामात आहेत. या मंदिरासाठी मिर्झापूर (वाराणसी) येथील ४ हजार टन चुनार दगड, ३२० टन मार्बल, ग्रॅनाईट, सागवान लाकूड आदी साहित्य लागले आहे. मंदिरात श्रीरामकृष्णांची समाधी अवस्थेतील सव्वा तीन फूट मूर्ती आहे. बेलूर येथील मठानंतरचे औरंगाबादेतील मंदिर सर्वात मोठे आहे, असे स्वामी विष्णुपादानंदजी यांनी सांगितले.