स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्यामुळे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांना पद सोडण्यास भाग पडल्याबद्दल भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांचा मराठवाडा मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष प्रा. बाबा उगले यांनी शहरातील गांधी चौकात शीर्षांसन करून निषेध केला.
या वेळी प्रा. उगले म्हणाले, अणे यांनी मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या मागणीचे समर्थन केल्यामुळे त्यांच्यावर राजीनाम्याची वेळ यावी, हे खेदजनक आहे. विकासाच्या संदर्भात मराठवाडय़ास नेहमीच सापत्नभावाची वागणूक पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी दिली आहे. आता युती सरकारच्या काळात विदर्भास झुकते माप देऊन मराठवाडय़ावर अन्याय केला जात आहे. विकासविषयक अन्याय दूर करण्यासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मिती आवश्यक आहे. कॉ सगीर अहमद, रमेश देडकर, गणेश चौधरी, राजू हिवाळे यांची भाषणे या वेळी झाली. स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मिती करण्याच्या संदर्भात घोषणा या वेळी देण्यात आल्या.
दरम्यान, जालना जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेतही अणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. बाप्पासाहेब गोल्डे यांनी मांडलेल्या ठरावास राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. संजय काळपांडे यांनी अनुमोदन दिले. अणे यांच्या वक्तव्याचा सदस्यांनी समाचार घेतला. जि.प. उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी मराठवाडा स्वतंत्र करून राज्याचे तुकडे करण्याचे अणे यांची भाषा बेजबाबदारपणाचे असल्याचे सांगितले.