स्वतंत्र मराठवाडय़ाच्या विचाराची पेरणी जालना जिल्ह्यात करून परतलेल्या श्रीहरी अणे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर स्वतंत्र मराठवाडा करावा की करू नये, यावरुन सुरू झालेल्या चच्रेत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मौनच बाळगले आहे. दानवे हे जालन्याचे खासदारही आहेत. याच जिल्ह्यात आयोजित जाहीर कार्यक्रमातून पेरल्या गेलेल्या स्वतंत्र मराठवाडय़ाच्या चच्रेपासून रावसाहेबांनी दूर राहणेच पसंत केले. सोमवारी चर्चा सुरू असताना ते जाफराबाद तालुक्यातच होते. त्यानंतरही सलग दोन दिवस त्यांचे मत जाणून घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

मराठवाडय़ातील भाजपचे बहुतांश आमदार एकसंघ महाराष्ट्राच्या बाजूचे असल्याच्याच प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी स्वतंत्र मराठवाडय़ाच्या मागणीला समर्थन दिले असले तरी अन्य आमदारांनी त्यास विरोध केला आहे. नाशिक येथे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर त्यांनी मी कधीच स्वतंत्र किंवा स्वतंत्र मराठवाडय़ाला पािठबा असे कोणतेही विधान केले नसल्याचे कळविले आणि आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे सांगत मराठवाडय़ात मागील ६० वषार्ंच्या विकासाचा अनुशेष असल्याचे म्हटले होते, असा खुलासा केला.

या अनुषंगाने बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, दुष्काळावरुन लक्ष विचलित व्हावे म्हणून केलेले वक्तव्य आहे. त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही. प्राधान्यक्रम वेगळे आहेत. अणेंच्या वक्तव्यांवर काथ्याकुट करण्यात काहीच अर्थ नाही. रावसाहेब दानवे का बोलत नाहीत, हे त्यांनाच विचारायला हवे.