अहमदनगरचे उपमहापौर आणि भाजप नेता श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद औरंगाबादेतही पहायला मिळाले. शहरातील उस्मानपूरा भागातील भाजपा कार्यालयाची जमावाने तोडफोड केली. मोटारसायकलवर आलेल्या पंधरा ते वीस संतप्त तरूणांनी भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला. तोंडाला रुमाल बांधला असल्याने तसेच गाडीची नंबर प्लेट झाकल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही.

अहमदनगरमध्ये उपमहापौर आणि भाजप नेते श्रीपाद छिंदम यांनी फोनवरील संभाषणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी छिंदम यांचे बोलणे सुरु आहे. एका सरकारी कामसाठी त्यांनी बिडवे यांना फोन केला होता. यावेळी बोलताना उपमहापौरांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप अशोक बिडवे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी कामगार युनियनकडे तक्रारही दाखल केली आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिपही त्यांनी पुराव्यासाठी सादर केली. मात्र, अल्पावधीतच ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, भाजपाने छिंदम यांना पक्षातून बडतर्फ केले असून उपमहापौर पदावरूनही त्यांची हाकालपट्टी करण्यात आली आहे.