औरंगाबाद : आठवड्यापूर्वीच जन्मलेल्या दोनपैकी एका पांढऱ्या बछड्याचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील पांढरा वाघ वीर व पिवळ्या रंगाची वाघीण भक्तीपासून जन्मलेला हा बछडा होता. भक्तीने ३ एप्रिल रोजीच दोन पांढऱ्या रंगांच्या बछड्याला जन्म दिला होता. एका बछड्याच्या मृत्यूमुळे आता सिद्धार्थमध्ये एकूण १५ वाघ राहिले असून चार वाघ हे पांढऱ्या रंगाचे उरले आहेत.

भक्ती वाघिणीची बछडे देण्याची ही पहिलीच वेळ होती. बछड्यांना जन्म दिल्यानंतर भक्ती वाघिणी मध्ये मातृत्वाची भावना दिसून आली नाही. त्यामुळे भक्ती वाघीण या बछड्यांची काळजी घेत नव्हती. तसेच स्वत: दूध पाजत नव्हती. त्यामुळे बछड्यांना ठरावीक अंतराने बकरीचे दूध पाजण्यात येत होते. दरम्यान, ६ एप्रिल २०२१ रोजी रात्री भक्ती वाघीण पिंजऱ्यामध्ये फिरत असताना या बछड्यावर तिचा पाय पडला होता. त्यामुळे पिलाना वेदना झाल्या. त्यात मृत झालेला बछडा दूधही कमी पीत होता. कालांतराने बछड्याने दूध पिणे बंद केले. दोन्ही बछड्यांना आईपासून वेगळे करून दुसऱ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. मृत बछड्यावर प्राणिसंग्रहालयाचे पशुवैद्यक डॉ. निती सिंग यांच्यामार्फत उपचार करण्यात आले. परंतु बछड्याने उपचाराला प्रतिसाद न दिल्याने शनिवारी सकाळी दोनपैकी एका पांढऱ्या बछड्याचा मृत्यू झाला. या बछड्याचे शवविच्छेदन पशुधनविकास अधिकारी डॉक्टर अश्विानी राजेंद्र यांनी केले. मृत्यू  झालेल्या बछड्याच्या अंत्यसंस्काराच्यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी .तांबे, वन परिमंडळ अधिकारी ए. डी. तांगडे यांची उपस्थिती होती. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार बछड्याच्या शरीरात रक्तस्रााव झाल्याने बछड्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती पालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार यांनी दिली.