औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता १८ हजाराहून अधिक झाली असून शुक्रवारी सायंकाळी सात पर्यंत १९९ रुग्णसंख्या वाढली. दरम्यान करोनामुळे आतापर्यंत ५७५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात तीन जणांना मृत्यू  झाला. सध्या चार हजार २५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान शहरातील विविध भागात रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, या आजाराविषयी असणारी भीती कमी झाली असल्याने व्यवहार सुरळीत झाले आहेत. मात्र, ग्रामीण भागात ३०८ गावांपर्यंत विषाणूने पाय पसरले आहेत. करोनाची सामूहिक प्रतिकार शक्ती तयार झाली आहे काय याचे ग्रामीण भागातही १६ ऑगस्टपासून सर्वेक्षण केले जाणार आहे.

शनिवारी सकाळच्या सत्रात ११४ जणांचे अहवाल करोना चाचणीला सकारात्मक आले असून मृत्यूची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी रुग्ण लवकारात लवकर उपचारासाठी दाखल व्हावा यासाठी प्रयत्न केले आहेत. दरम्यान शहरातील विविध भागातील चाचण्यांचे प्रमाण पुन्हा वाढविण्यात आले आहे. शुक्रवारी तीन हजार प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या होत्या. यातील शहराच्या सहा प्रमुख  प्रवेशव्दारावर १ हजार ७३४ जणांची चाचणी करण्यात आली होती तर शहरातील विविध भागात १ हजार ८१० चाचण्या करण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसापासून शहर हद्दीमध्ये चाचण्या कमी होत असल्याचे सांगण्यात येत होते. त्यावर आता तोडगा काढल्याचे दिसून येत आहे. गणपती मूर्ती विक्रेत्यांना चाचणी अनिवार्य करण्यात आल्याने चाचण्यांची संख्या वाढेल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान अतिक्रमणे हटाव मोहीम आणि शहरातील विविध कामांना महापालिकेमार्फत सुरुवात करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील संसर्गाच्या अनुषंगाने बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले म्हणाले की, ‘सध्या रुग्ण असलेल्या गावांची संख्या तशी ५० पेक्षा अधिक नाही. ५८ गावांमध्ये दहापेक्षा अधिक रुग्ण नाहीत. यातील बहुतांश गावांमधून आता संसर्ग राहिलेला नाही. मात्र, शहराभोवती बजाजनगर भागात ज्या प्रमाणात संसर्ग वाढला तसा तो कोठेच आढळला नाही.’ जिल्ह्यातील सिरो सर्वेक्षणाचे अहवाल २० ऑगस्टपर्यत मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर नक्की विषाणू किती पसरला होता हे कळू शकेल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहरणासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर मागील काही दिवसातील कामाची माहिती दुपारी सादर करण्यात आली.