News Flash

एसआयटीसमोर शंभर जणांची हजेरी; संचालकांविरुद्ध कारवाईची तलवार

१०५ लोकांना मागील आठवडय़ात नोटीस बजावून एसआयटीसमोर हजर राहण्यास फर्मावले होते.

जिल्हा बँकेतील बनावट व बेकायदा कर्ज प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, आमदार अमरसिंह पंडित या दिग्गजांसह गुन्हा दाखल असलेल्या १०५पकी जवळपास १००जणांनी पोलिसांच्या विशेष पथकासमोर हजेरी लावून जबाब नोंदवले. तपासणी पथकाने सर्वाचे जबाब नोंदवून घेतल्याने न्यायालयात आता १३ जुल रोजी अहवाल सादर केला जाणार आहे. चौकशीत बहुतांश मोठय़ा संस्थांना देण्यात आलेली कर्जे ही तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळाने आपला विशेषाधिकार वापरुन दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बँकेच्या नुकसानीची भरपाई करुन घेण्याबरोबरच संचालकांवर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हा सहकारी बँकेतील १४१ कोटी रुपयांच्या गरव्यवहाराप्रकरणी ५ वर्षांपूर्वी तत्कालीन प्रशासकांनी बँकेचे संचालक आणि लाभार्थी संस्थांचे संचालक अशा १०५ लोकांविरुद्ध १३१ गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल होऊन अनेक वष्रे लोटली, तरी तपास होत नसल्याने काँग्रेसचे हरिभाऊ सोळंके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. लाखो ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडलेल्या असताना मोठय़ा थकबाकीदार आणि बनावट कर्ज घेणाऱ्या लोकांवर कारवाई होत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले.
मागील महिन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीही पोलीस मध्यम मुदतीचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना अटक करतात, मात्र मोठय़ा लोकांना का अटक करत नाहीत? असा जाहीर प्रश्न करुन पोलिसांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले. या पाश्र्वभूमीवर न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाने खासगी संस्थेची मदत घेऊन आíथक गुन्ह्यातील प्रत्येकाचा सहभाग निश्चित केला, तर मोठय़ा चार संस्थांना देण्यात आलेल्या कर्ज प्रकरणात नव्याने संचालकांवर गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल झालेल्या १०५ लोकांना मागील आठवडय़ात नोटीस बजावून एसआयटीसमोर हजर राहण्यास फर्मावले होते. सुरुवातीला अटकेच्या भीतीने सर्वच जण भूमिगत झाले. मात्र, पहिल्या दिवशी काहींना जबाब घेऊन सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिग्गजांनी हजेरी लावत ‘तो मी नव्हेच’चा खेळ रंगवला. एसआयटीसमोर बहुतांश संचालकांनी आपण केवळ सह्या केल्या, आपल्याला काहीच माहीत नाही, तर काहींनी देण्यात आलेल्या कर्जाला आपण कसा विरोध केला होता या बाबतची माहिती देत आपण निर्दोष असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.
गुन्हा दाखल असलेल्या जवळपास शंभर जणांनी चार दिवसांत जबाब नोंदवले. पोलिसांनी तपास करुन आता अहवाल न्यायालयात १३ जुलला दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तपासादरम्यान बहुतांश कर्ज तत्कालीन अध्यक्ष असलेल्यांनी व संचालकांनी सर्वसाधारण सभेत विशेष अधिकार वापरुन मंजूर केल्याचे समोर आले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुरेसे तारण नसल्यामुळे तर काही संस्थांवर इतर बँकेचे कर्ज असल्यामुळे आणि परतफेडीची शाश्वती नसल्यामुळे कर्ज देऊ नये, अशा प्रकारची भूमिका घेतली असतानाही संचालक मंडळाने आपला अधिकार वापरत कर्ज दिल्याचे समोर आले आहे. यात प्रामुख्याने तत्कालीन अध्यक्ष असलेले राजाभाऊ मुंडे, मंगल मोरे, सुभाष सारडा, अमरसिंह पंडित, धर्यशील सोळंके यांचा समावेश आहे. त्यामुळे अकराशे कोटी रुपये ठेवी असलेली बँक बंद पडल्यानंतर गुन्हे दाखल झालेल्या तत्कालीन संचालक मंडळाकडून बँकेची नुकसान झालेली १४१ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्याबरोबरच अटकेची टांगती तलवार कायम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2016 2:26 am

Web Title: sit call hundred people for investigation in district bank scam
Next Stories
1 विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी सहकार्य हवे
2 शेतकरी कर्जमाफीवर उच्च न्यायालयाची ‘नो कमेंट’!
3 मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर बोलण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा नकार
Just Now!
X