अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजीमहाराज स्मारकाचा आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे. येत्या मे महिन्यात त्याचे भूमिपूजन करण्यात येणार असून, शिवस्मारक प्रकल्प विभाग कार्यालयाचे ११ एप्रिलला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री सुभाष देसाई आदींची या वेळी उपस्थिती राहणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी दिली.
शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी मुंबईतील शिवस्मारकाच्या कामाची येथे पत्रकार बठकीत माहिती दिली. मेच्या पहिल्या आठवडय़ात अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. स्मारकाचा आराखडा बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, कामाची व्याप्ती लक्षात घेता प्रकल्पासाठी स्वतंत्र कार्यालय आवश्यक होते. त्यामुळे मुंबईत समुद्रकिनाऱ्यावरच हे कार्यालय उभारण्यात आले आहे. सोमवारी (दि. ११) सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. छत्रपती शिवाजीमहाराज स्मारक प्रकल्प असा स्वतंत्र विभाग करण्यास मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच मान्यता दिली आहे. ३१ डिसेंबर २०१८पर्यंत स्मारक प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याचा दावाही मेटे यांनी केला.
शिवसंग्रामकडून गेल्या दोन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांची वयोमर्यादा वाढविण्यासंदर्भात आंदोलन केल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत:चे अधिकार वापरून वयोमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतल्याने लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचे मेटे यांनी सांगितले.