मुलींच्या शैक्षणिक भवितव्यासाठी व आíथक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला पालकांमधून चांगला प्रतिसाद मिळाला. नऊ हजार खात्यांतून तब्बल सहा कोटींची गुंतवणूक झाली. मुलींच्या भवितव्यासाठी सरकारी योजनेत मोठय़ा प्रमाणात पालकांकडून गुंतवणूक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. टपाल कार्यालयामार्फत गावागावांतून खाते उघडून मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न होत आहे.
जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढावा, या साठी सरकारी पातळीवरुन अनेक योजना सुरू करण्यात आल्या, तर स्थानिक पातळीवरही काही संस्थांनी पुढाकार घेतला. सामाजिक मानसिकता लक्षात घेता मुलींचे शिक्षण आणि आíथक सक्षमीकरणाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती कमी झाल्याचे अजूनही दिसत नाही. मुलीला परक्याचे धन मानण्याच्या विचारातून मुलीला शिक्षण व आíथक स्वावलंबनापासून दूरच ठेवले जाते. या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू करुन दहा वर्षांपर्यंत वय असलेल्या मुलींच्या नावाने पालकांनी टपाल खाते उघडून एक हजार रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत चौदा वष्रे रक्कम भरणा करायचा आहे. वयाची १८ वष्रे पूर्ण झाल्यावर मुलींच्या शिक्षणासाठी या गुंतवणुकीतून तिला व्याजासह अर्धी रक्कम मिळणार आहे, तर २१ वर्षांनंतर सर्व रक्कम घेऊन खाते बंद करता येते.
पालकांनी केलेल्या या गुंतवणुकीमुळे मुलीला शिक्षणासाठी लागणारा पसा त्यातून उभा राहतो व तिचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित राहते, असा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे टपाल कार्यालयामार्फत मोठय़ा प्रमाणात जनजागृती करुन लोकांपर्यंत ही योजना पोहोचविण्यात आली. त्यातून जिल्ह्यातील ३६ उप डाकघरांतर्गत २९४ पोस्ट कार्यालयांमधून ९ हजार १७२ खाते उघडण्यात आली. ६ कोटी १ लाख ६१ हजार ५० रुपयांची गुंतवणूक झाली.