News Flash

बारावी उत्तरपत्रिका पुनर्लेखन; मंडळाचे ६ कर्मचारी निलंबित

बारावी परीक्षा उत्तरपत्रिकांचे पुनर्लेखन करून गुणवाढ करण्यासंदर्भात तालुका जालना पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्य़ांत आतापर्यंत १५जणांना अटक झाली आहे.

बारावी परीक्षा उत्तरपत्रिकांचे पुनर्लेखन करून गुणवाढ करण्यासंदर्भात तालुका जालना पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्य़ांत आतापर्यंत १५जणांना अटक झाली आहे. यात प्राचार्यासह २ प्राध्यापक, ५ शिक्षक, तसेच औरंगाबाद विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातील ६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या साखळीत परीक्षा मंडळाचा सहभाग कशा प्रकारे आहे, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहे. सर्व १५ आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
येथील सहायक पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या नेतृत्वाखालील पथकास साडेचारशे उत्तरपत्रिका पुनर्लेखन केलेल्या आढळून आल्या. त्यानंतर या उत्तरपत्रिका नेमक्या कुठून आल्या, याचा शोध घ्यायचा आहे. पुनर्लेखन झालेल्या उत्तरपत्रिकांचे विद्यार्थी मंडळाच्या नियमानुसार काही काळासाठी पुन्हा परीक्षेस बसू शकणार नाहीत. एकूणच या प्रकरणात औरंगाबाद मंडळातील गोपनीय विभागामधील संशयास्पद कर्मचाऱ्यांची चौकशी पूर्ण झाल्यावर आणखी काही बाबी पुढे येतात का, याकडे सध्या तपास यंत्रणेचे लक्ष आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बँक खात्यांच्या तपासणीची शक्यताही तपास यंत्रणेने व्यक्त केली.
अटक झालेल्या अशोक नंद, दीपक शिंदे, योगेश पालेवाड, रमेश गायकवाड, दिलीप ब्रह्मपूरकर व प्रशांत देऊळगावकर या ६ कर्मचाऱ्यांना औरंगाबाद विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने सेवेतून निलंबित केले आहे.
दरम्यान, औरंगाबाद विभागीय मंडळाचे माजी सदस्य प्र. स. हुशे यांनी या प्रकरणामुळे मंडळाची विश्वासार्हता संपल्यामुळे सीआयडी चौकशीची मागणी केली. रॅकेट चालवणारी यंत्रणा निमित्त असून या सर्व प्रकरणास परीक्षा मंडळाची यंत्रणा जबाबदार आहे. या प्रकरणात सहभागी शैक्षणिक संस्थांची मान्यता रद्द करण्याची मागणीही हुशे यांनी केली आहे. युवा सेनेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य जगन्नाथ काकडे यांनी शिष्टमंडळासह विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांची भेट घेऊन या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. परीक्षेचे आयोजन ते निकाल जाहीर करण्यापर्यंतची सर्व जबाबदारी मंडळाची असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमॉक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या स्थानिक शाखांनीही या प्रकरणात सीआयडी चौकशीची मागणी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2016 1:10 am

Web Title: six employee suspended in 12th answer sheet rewrite issue
टॅग : Jalna
Next Stories
1 विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डेरे निलंबित
2 विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरे निलंबित
3 जालन्यात सीड हब स्थापन करणार
Just Now!
X