जिल्ह्य़ातील दुष्काळी परिस्थिती ओळखून या भागात जलसंधारणाची कामे अधिक व्यापक प्रमाणात व गतीने व्हावीत यासाठी नाम फाउंडेशनने नांदेड जिल्ह्य़ासाठी १० उच्च क्षमतेची जेसीबी मशीन देण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी चार मशीन नांदेड जिल्ह्य़ात दाखल झाल्या आहेत. त्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली असून उर्वरित ६ मशीन येत्या तीन दिवसांत दाखल होणार आहेत.
मागील दोन वर्षांपासून नांदेड जिल्ह्य़ात सरासरीच्या अध्र्यापेक्षाही कमी पाऊस पडतो आहे. २०१४ मध्ये केवळ ४४ टक्के पाऊस झाला, तर गतवर्षी ४९ टक्के पाऊस झाला. यामुळे शेतीचा तर पुरता बट्टय़ाबोळ झालाच; परंतु पिण्याच्या पाण्याची ‘न भूतो..’ स्वरुपाची टंचाई निर्माण झाली आहे. भूजल पातळीही खालावली आहे. किमान ४०० फुटांशिवाय पाणीच लागत नाही, असे चित्र आहे.
या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने २०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त करतानाच प्रत्येक शिवारात पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी जलयुक्त शिवार अभियान महत्त्चाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेतले आहे. यात लोकसहभागातून गाळ काढणे, नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण अशी बहुविध कामे केली जात आहेत. नांदेड जिल्ह्य़ातही ८ शासकीय जेसीबीशिवाय अनेक ठिकाणी शेतकरी पदरमोड करून जलाशयातील गाळ काढून आपापल्या शेतात नेत आहेत. या कामाला वेग यावा आणि व्याप्ती वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाने नाम फाउंडेशनकडे सहकार्य मागितले होते. त्यानुसार नामचे राज्य समन्वयक केशव आघाव आणि मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके हे  ११ एप्रिल रोजी नांदेडला आले होते. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर त्यांनी १० जेसीबी देण्याचा शब्द दिला होता.
दरम्यान, २ जेसीबी १३ एप्रिल रोजी नांदेडमध्ये दाखल झाल्या. त्यापैकी एक पिंपळगाव (ता. धर्माबाद) आणि दुसरी वाघलवाडा (ता. उमरी) येथे पोहोचल्या असून नाला सरळीकरणाचे काम सुरू आहे. उपविभागीय अधिकारी धरमकर आणि तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. १४ एप्रिल रोजी तिसरी जेसीबी उस्माननगर (ता. कंधार) येथे पोहोचली. तीच मशीन १६ एप्रिल रोजी काटकळंबा (ता. कंधार) येथे नाला सरळीकरणासाठी वापरण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील आणि तहसीलदार अरुण संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथे काम सुरू आहे. चौथे मशीन मालेगाव (ता. अर्धापूर) येथे पोहोचली असून येथेही नाला सरळीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू आहे. उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी आणि तहसीलदार सतीश सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. संपूर्ण कामांवर जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांचे नियंत्रण असून ते सातत्याने आढावा घेत आहेत. नामतर्फे अजून ६ मशीन येत्या तीन दिवसांत दाखल होत असून त्या अन्य तालुक्यांत पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती तहसीलदार सुरेश घोळवे यांनी दिली.