शहरातील शनी मंदिराची  ७४ एकर जमीन विश्वस्तांनीच परस्पर विक्री, सहा वर्षांपासून दान पेटीत आलेली लाखो रुपयांची रक्कम, सोने-चांदी तसेच राजस्थानी सेवा संस्थेकडून येणाऱ्या तीस वर्षांतील किरायाचा चाळीस लाख रुपयांचाही हिशोब ठेवला नसल्याच्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीनंतर लातूर येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त  यांनी सातही विश्वस्तांना दोषी ठरवून बडतर्फ केले. तहसीलदार, सहाय्यक धर्मादाय आयुक्त आणि दहा वर्षांपासून शनी मंदिर विश्वस्तांच्या गरकारभाराविरुध्द लढणारे रामनाथ खोड यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तब्बल दहा वर्षांच्या संघर्षांनंतर भ्रष्ट विश्वस्तांच्या विळख्यातून शनी मंदिराची सुटका झाली आहे.
बीड शहरातील पेठबीड भागातील शनी मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान आहे.  दर शनिवारी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, या मंदिराची स्थावर मालमत्ता, देणगी हडप केल्याची तक्रार करण्यात आली होती. या मंदिराच्या नावे ३०० एकर जमीन आहे. तसेच अनेक ठिकाणी मोक्याच्या जागा आहेत.  भाविकांची वर्दळ असल्याने प्रतिदिन देणगी स्वरुपात रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने येतात. हे संस्थान श्रीमंत मानले जाते. मात्र, मागील काही वर्षांपासून या संस्थानाच्या सात विश्वस्तांनी कोणताही हिशोब न ठेवता शनी मंदिरात येणारी देणगी, सोने-चांदीचे दागिने परस्परच हडप केले. संस्थानाची जवळपास ७४ एकर जमीन परस्पर विक्री करुन टाकली. राजस्थानी सेवा समाज संस्थेला १९८२पासून भाडेतत्त्वावर दिलेल्या जागेचे ४० लाख रुपयांचाही हिशोब नाही. त्या विरोधात २४ वर्षीय रामनाथ खोड यांनी विश्वस्तांच्या गरकारभारांविरुध्द दहा वर्षांपूर्वी पहिली तक्रार केली. तक्रारीनंतर खोड यांना आमिष दाखवून गप्प करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर धमक्या, मारहाण आणि खोटय़ा तक्रारींमध्येही अडकवून हैराण करण्यात आले. विश्वस्त मंडळातील सात सदस्यांना दिग्गज राजकीय वरदहस्त आहे. मात्र, रामनाथ खोड यांनी आपला संघर्ष चालू ठेवला. अखेर खोड यांच्या तक्रारीची निरीक्षकांमार्फत संपूर्ण चौकशी करुन अहवाल धर्मादाय आयुक्त यांना देण्यात आला होता. चौकशीत विश्वस्त मंडळाचे भ्रष्ट कारनामे, गरव्यवहार स्पष्ट झाले होते. तक्रारदाराचीही उलट तपासणी विश्वस्तांबरोबर घेण्यात आली होती. या प्रकरणी विश्वस्तांना दोषी धरुन त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय लातूरचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त श. ल. हल्रेकर यांनी दिला. सातही विश्वस्तांना यापुढे संस्थानात विश्वस्त होण्यापासून प्रतिबंध करण्याचेही स्पष्ट केले आहे.