ऑटो क्षेत्रातील मंदी आणि दुष्काळामुळे औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्हय़ांतील विक्रीकरात कमालीची घट झाली आहे. चारचाकी वाहनांच्या क्षेत्रातून अधिक कर मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, स्कोडाकडून २५३ कोटी रुपयांचा कर कमी मिळाला. या कंपनीची आर्थिक उलाढाल गेल्या वर्षी ५ हजार २१० कोटी रुपये होती. ती या वर्षी ४ हजार ६८९ कोटी रुपये झाली आहे. तसेच कोरोमंडल ही सिमेंट उत्पादक कंपनी, लावा ही मोबाईल कंपनी यांनी त्यांचे मुख्यालय औरंगाबादहून हलविले असल्याने विक्रीकराचे उद्दिष्ट कमी झाले आहे. या वर्षी ३ हजार ४१ कोटी रुपये विक्रीकरातून मिळतील, असे अपेक्षित होते. तथापि २ हजार ५०१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. १७.७८ टक्के कमी महसूल झाल्याने त्याच्या कारणांची यादी सरकारदरबारी सादर केली जात आहे.
ऑटो क्षेत्रातील मंदीबरोबरच दुष्काळाचाही मोठा फटका बसल्याचे विक्रीकरातून मिळणाऱ्या महसुलात तब्बल ५४० कोटी रुपयांची घट झाली आहे. जालना शहरातील सळई बनविणाऱ्या कंपन्याही बंद पडल्या आहेत. मात्र, दुष्काळाचा खरा फटका कापसातून मिळणाऱ्या उत्पन्नास बसला आहे. तब्बल १५.८० कोटी रुपये कमी मिळाले. केवळ स्कोडाच नाही, तर सॅबमिलर या कंपनीकडून मिळणाऱ्या महसूलातही मोठी घट दिसून आली आहे. गेल्या वर्षी सॅबमिलरकडून ४०८ कोटी रुपये विक्रीकर मिळाला होता. तो या वर्षी तब्बल ३०१ कोटी रुपयांपर्यंत घसरला.मद्यनिर्मिती कंपन्यांचे पाणी कपात नसतानाही झालेली ही घट लक्षणीय मानली जाते. लिलासन्स या बिअर उद्योग कंपनीकडूनही गेल्या वर्षी २१३ कोटींचा कर मिळाला होता. तो या वर्षी १२४ कोटी रुपयांपर्यंत खाली आला.
ग्रॅनोच या मद्यनिर्मिती कारखान्याकडूनही मिळणाऱ्या करात घट झाल्याने विक्रीकराचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. ऊस खरेदीकर आणि कापूस यांचे उत्पादन घटले. याचाही फटका बसल्याचे विक्रीकर विभागाचे सहआयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले.औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्हय़ांत ३८० मोठे करदाते आहेत. एक कोटीपेक्षा अधिक कर देणाऱ्या या करदात्यांच्या व्यवसायाला लागलेली घसरण विक्रीकरास कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.