औरंगाबादमध्ये मृतांचा आकडा हजाराच्या उंबरठय़ावर

औरंगाबाद : मराठवाडय़ातील करोना प्रसार कमी होत असल्याची आकडेवारी दिसून येत असून महापालिका क्षेत्रात पहिल्यांदा शंभरापेक्षा कमी रुग्ण आढळून आले. दरम्यान आतापर्यत जिल्ह्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ९९६ एवढी झाली आहे. मराठवाडय़ात एक दिवसात होणारी वाढही एक हजाराच्या आत आली आहे. मराठवाडय़ात आतापर्यंत तीन हजार २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. आता करोना संसर्गातून बरे होण्याचा दर ८५ .०८  वर गेला आहे. दरम्यान, खाटा रिकामा राहण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, पावसाळी वातावरणामुळे संसर्ग वाढू नये म्हणून काळजी घेण्याची  गरज असल्याचे वैद्यकीय अधिकारी आवर्जून सांगत आहेत.

करोना संसर्गाचा आकडा घसरणीला लागलेला असला तरी प्रशासकीय पातळीवर संपर्कशोध आणि त्यांच्या चाचण्या सुरू आहेत. हिंगोली आणि बीड जिल्ह्यातील हे प्रमाण अजून प्रत्येक रुग्णामागे २० आणि २३ असल्याचे सांगण्यात येत आहे. लातूरमध्येही संपर्काची पद्धत अगदी पहिल्यासारखी सुरू असल्याचे सांगण्यात येते. समूह संसर्ग झालेला असला तरी सरकारी पातळीवर तो स्वीकारला जात नाही. मात्र, काही जिल्ह्यात संसर्ग नियंत्रणाची पकड कायम असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यात असणारे मृत्यूचे प्रमाणही आता प्रतिदिन २० पर्यंत खाली आले असल्याचे रविवारी दिसून आले. दरम्यान रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तीन जणांचा मृत्यू झाला. गुलमंडी सराफ भागातील ८० वर्षांच्या तसेच कांचनवाडी येथील ८५ वर्ष वृद्धाचा मृत्यू झाला.  या दोन्ही वृद्ध व्यक्तींना अन्य कोणतेही आजार नव्हते. तर वैजापूर तालुक्यातील राजूरा येथील ८० वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. घाटी रुग्णालयातील मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ७७६ एवढी झाली आहे. पण गेल्या काही दिवसात दररोज गंभीर अवस्थेत दाखल झाल्यानंतर संसर्गमुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. मराठवाडय़ातील करोना रुग्णांचा मृत्यू दर आता २.८५ वर पोहोचला आहे.