18 October 2018

News Flash

औरंगाबाद आता हायटेक!

औरंगाबाद शहर हे नियोजित स्मार्ट शहरांच्या यादीतले.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

औरंगाबाद शहर हे नियोजित स्मार्ट शहरांच्या यादीतले. अद्याप त्यादृष्टीने प्रत्यक्ष काम सुरू झालेले नसले तरी त्याअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा पोलीस विभागाला मात्र फायदा होताना दिसत आहे. प्राप्त निधीतून सीसीटीव्हींच्या रूपात काम करण्याला जागा मिळाली आहे. शहरातील २५० सीसीटीव्ही सुस्थितीत आले असून गस्तीच्या वाहनांवरही जीपीएसची यंत्रणा लावण्यात आली आहे. त्यामुळे गुन्ह्य़ांमध्ये घट झाल्याचा दावा करीत येत्या तीन महिन्यांत आणखी दोन हजार सीसीटीव्हीच्या नजरेतून शहर पोलिसांच्या देखरेखीत आणले जाणार असल्याचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सांगितले. यापुढे येथे येऊन मंगळसूत्र चोरी, लूटमार करणाऱ्यांचा ठावठिकाणा दाखवणारा चोरटय़ांचा शहरातला प्रवासपटच पोलिसांकडे तयार असेल. हा प्रयोग लंडनच्या धर्तीवर केला जात आहे, अशी माहितीही यादव यांनी दिली.

साधारण तीन महिन्यांपूर्वी शहरात मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली होती. मराठवाडय़ालगत असलेल्या बुलढाणा जिल्ह्य़ातील चिखली येथून योगेश ऊर्फ राहुल गिरी ऊर्फ भुऱ्या हा चोर शहरात येऊन मंगळसूत्र चोरी करून जायचा. दुचाकीवर यायचा आणि तीन ते चार तासांच्या अंतरावरील चिखलीत जाऊन राहायचा. शहरातील काही सीसीटीव्ही बंद असल्यामुळे भुऱ्याचे फावायचे. एका ठिकाणी हात मारला की लॉजवर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पुन्हा एक हात मारून भुऱ्या चिखलीकडे जायचा. मात्र अलीकडे पोलीस विभागाकडून बंद सीसीटीव्ही सुरू करण्यासाठी पुण्यातील एका कंपनीकडे पाठपुरावाच सुरू ठेवला. आता शहरातील २५० सीसीटीव्ही सुरू आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शंभर कोटी मंजूर झाले आहेत. त्यातील काही रक्कम सीसीटीव्हीसाठी मिळाली आहे. सीसीटीव्ही सुरू झाल्यामुळे भुऱ्यासारखे मंगळसूत्र चोर पोलिसांच्या हाती लागले. दोन महिन्यांपूर्वी भुऱ्याला पकडले तेव्हा त्याच्याकडून १४ तोळे सोने जप्त केल्याची माहिती उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी एका पत्रकार बैठकीत दिली होती. मध्यंतरी औरंगाबादेतील एका नामांकित डॉक्टरला खंडणी मागणारे, पतसंस्थेची रक्कम स्वत:च चोरी करून लुटल्याची बतावणी करणारे, आठवडाभरापूर्वी वाळूज भागात तीन लाखांची रोख रक्कम पळवून नेणाऱ्यांचा तपासही सीसीटीव्हीच्या माध्यमातून लावण्यात पोलिसांना यश आले आहे. औरंगाबादेतील गाजलेल्या होळकर खून खटल्यातील आरोपींनी घटनेपूर्वी परिसराची कशी रेकी केली होती, याचा सुगावाही सीसीटीव्हींच्या माध्यमातून लागला. फुटेजच्या आधारेच गुंतागुंतीच्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास लावण्यात गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना सहकाऱ्यांच्या साथीने यश आले होते.

येत्या तीन महिन्यांत औरंगाबाद शहरात  दोन हजार सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.  सिग्नल तोडणारे, पोलिसांशी हुज्जत घालणारे, एखादी व्यक्ती अचानक बेपत्ता झाली तर त्याचा दोन-तीन दिवसांपूर्वीचा शहरातील प्रवास, यावरून त्याच्या शोधासाठीचे धागेदोरे हे सर्व सीसीटीव्हीतून प्राप्त होणार आहे. लंडनमध्ये १७३ ठिकाणी सीसीटीव्ही आहेत, त्यातून प्रत्येक व्यक्तीचा प्रवासपट टिपला जातो, अशी माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली.

तीन खून, तपास थंड

औरंगाबाद शहराजवळील दौलताबाद येथे सहा महिन्यांपूर्वी एका महिलेचा मृतदेह सापडला होता. त्या गुन्ह्य़ातील धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. आधारकार्डवरील ठशांच्या माध्यमातून आम्ही शोध घेत आहोत, असे पालुपद पोलिसांचे कायम सुरू असते. दौलताबादच्या घाटातच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह विहिरीत आढळला होता. शहरातील जिन्सी भागातही दोन महिन्यांपूर्वी एक खुनाची घटना घडली होती. या तिन्ही घटनांच्या तपासाचे धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती नाहीत. जिन्सी भागातील खुनाच्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागल्याचा दावा पोलीस आयुक्त यशस्वी यादव करतात.

वाहनचोरीचे आव्हान

शहरात दरदिवशी चार ते पाच दुचाकीचोरीच्या घटना नोंद होताना दिसतात. गत वर्षी दोन हजार वाहने शहरातून चोरीस गेली आहेत. या वर्षीही आतापर्यंत सातशे ते आठशे वाहने चोरी गेल्याचा अंदाज आहे. या गुन्ह्य़ातील वाहनचोर पोलिसांच्या हाती लागत नाहीत. मध्यंतरी जालन्यातून एका मैड नामक तरुणाला दोन वेळा पकडण्यात आले. मात्र तेवढय़ापुरत्याच वाहनचोरीच्या घटना थांबल्या. केवळ दुचाकीच नव्हे तर हायवा, ट्रक, टेम्पो, जेसीबीही चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

 

First Published on December 8, 2017 2:47 am

Web Title: smart city project in aurangabad