बंदच्या आदेशाने बाजारपेठेत गर्दी उसळली

यवतमाळ : एकाच दिवशी आठ करोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाने शुक्रवार दुपारपासून सोमवापर्यंत शहर पूर्णबंद करण्याचे आदेश काढले. त्यामुळे आज सकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी तोबा गर्दी उसळली होती. शुक्रवारी दुपारी १२ वाजेपासून सोमवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शहरात दवाखाने व औषधी दुकाने वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश काढले. गुरुवारी रात्रीच प्रशासनाचे हे आदेश समाज माध्यमांवर सार्वत्रिक झाल्याने आज सकाळी ६ वाजतापासूनच बाजारपेठेत नागरिकांनी किराणा व इतर साहित्य खरेदीसाठी गर्दी केली.

किराणा दुकानांसमोर खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या तर डेअरी, भाजीची दुकाने येथेही तोबा गर्दी होती. रविवारी अक्षय्य तृतीया असल्याने त्याचे साहित्य घेण्यासाठीही नागरिक मोठय़ा प्रमाणात घराबाहेर पडले. दत्त चौक, मुख्य बाजारपेठ, आर्णी नाका, स्टेट बँक चौक, दर्डा नगर आदी भागात गर्दीने गेल्या महिनाभरातील सर्व रेकॉर्ड मोडले. या गर्दीला ‘सोशल डिस्टन्सिंग’चाही विसर पडला. अनेक दुकानात लोकं दाटीवाटीने उभे होते. दुपारी बारापर्यंत पोलिसांनीही बऱ्यापैकी सूट दिली होती. मात्र १२ वाजतानंतर पोलिसांनी शहरात गस्त घालून दुकाने बंद करण्याचे फर्मान काढून नागरिकांना पुढील चार दिवस घरातच राहण्याचे आवाहन केले. बंदच्या काळात दूध विक्रीची दुकाने सकाळी व संध्याकाळी दोन तास सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र करोना संसर्ग रोखण्यासाठी याबाबतही प्रशासनाने फेरविचार करावा, अशी मागणी पुढे आली आहे.