करोनामुळे आरोग्याबरोबरच दैनंदिन खर्चात वाढ; सामाजिक संस्थांची अवस्था बिकट

औरंगाबाद : ‘एचआयव्ही’ग्रस्त आणि निराधार मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थांपुढे करोनामुळे नवे संकट उभे राहिले आहे. आरोग्याबरोबरच दैनंदिन खर्चात वाढ झाल्याने त्यांना अर्थचिंता सतावू लागली आहे.

एकीकडे ‘एचआव्ही’ आणि दुसरीकडे करोना विषाणूची भीती, अशा दुहेरी संकटात असलेल्या ‘इन्फट इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेतील ७० मुलांना यापुढे जगवायचे कसे, असा प्रश्न दत्ता आणि संध्या बारगजे या संस्थाचालकांना पडू लागला आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’मधून मदत मिळाल्यानंतर पुनर्भरारी घेतलेल्या या संस्थेला आता पुन्हा मदतीची गरज निर्माण झाली आहे. लोकनिधीवर चालणारी ही संस्था करोनासंकटात टिकवून ठेवणे आव्हानात्मक असल्याचे बारगजे यांनी सांगितले.

बारगजे गेली काही वर्षे बीड जिल्ह्य़ात ‘एचआयव्ही’ग्रस्त मुलांचा सांभाळ करतात. यासाठी आतापर्यंत त्यांनी कोणतेही सरकारी अनुदान घेतलेले नाही. टाळेबंदी सुरू झाली तेव्हा विविध क्षेत्रांतील मंडळींकडून मिळालेल्या मदतीच्या आधारे त्यांनी तीन महिन्यांचा किराणा व धान्य आणून ठेवले. संस्थेमध्ये नव्या माणसांचा वावरच होणार नाही, याची काळजी घेतली. ‘एचआयव्ही’ विषाणूचा संसर्ग झालेल्या या मुलांची प्रतिकारशक्ती आधीच क्षीण असते. त्यामुळे वेळेवर आणि सकस आहार त्यांचे आयुष्य वाढविते. मात्र गेले तीन महिने कसेबसे काढणाऱ्या या संस्थेपुढे आता पुढची मदत मिळणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 आर्थिक भार सोसेना..

औरंगाबाद शहरातील ‘साकार’ ही संस्था आई-वडिलांनी सोडलेल्या नवजात मुलांचा सांभाळ करते. या संस्थेत सध्या २० बालके आहेत. त्यांचा सांभाळ करणाऱ्या आया राहात असलेल्या भागात करोना प्रादुर्भाव वाढल्याने आता त्यांना संस्थांमध्ये राहावेच लागते. आधीच दरमहा साडेतीन लाख रुपये खर्च येणाऱ्या या संस्थेवरचा भार करोनामुळे वाढल्याचे संस्थेच्या प्रमुख डॉ. सविता पानट यांनी सांगितले. कोणत्याही अनुदानाशिवाय काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांची अवस्था नाजूक बनली असून, अनुदानित संस्थांनाही वेळेवर अनुदान न मिळाल्याने त्यांच्यासमोरही अर्थसंकट उभे राहिले आहे.