उडाणटप्पू मुलांची संगत सुटावी, म्हणून तिने मुलाला वेळोवेळी सांगून वागणूक सुधारण्याचा प्रेमळ सल्ला दिला. परंतु बिघडलेल्या मुलाने निर्दयीपणाने आईलाच संपवून टाकण्याचा कट रचला आणि साथीदारांना तशी सुपारी देत तडीसही नेला. मात्र, खुनाचे बिंग पोलिसांनीच पाचव्या दिवशी फोडले.
एसी दुरुस्तीच्या बहाण्याने घरात घुसून प्रणिता पेन्सलवार (वय ४५) या महिलेची गेल्या २६ मे रोजी भर दुपारी गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. उदगीर येथे घडलेल्या या प्रकारामुळे जिल्ह्य़ात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकारानंतर प्रणिता पेन्सलवार यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास पतीसह नातेवाईकांनी नकार दिला. घटनेच्या निषेधार्थ उदगीर शहरात उत्स्फूर्त ‘बंद’ही पाळण्यात आला होता. तब्बल ३६ तासांनंतर प्रणिता पेन्सलवार यांचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी शांतपणे तपासाची सूत्रे गतिमान केली आणि पाच दिवसांतच या प्रकरणाचा छडा लावला. मात्र, तपासातून समोर आलेल्या वास्तवाने पोलीसही चक्रावून गेले. याचे कारण या खुनात प्रत्यक्ष या महिलेच्या काळजाच्या तुकडय़ाने, अल्पवयीन मुलाने तिच्या खुनाची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. या घटनेतील अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले, तर शुभम मस्के व नदीम ताहेर या दोघा अन्य आरोपींना अटक करण्यात आली.
पेन्सलवार यांचा किराणा व्यवसाय आहे. अधूनमधून हा मुलगा गल्ल्यावर बसत असे. गल्ल्यावर बसल्यानंतर त्यातील पसे अलगद काढून घेई. दुकानात उलाढाल मोठी असल्यामुळे वडिलांना या चोरीचा फारसा अंदाज आला नाही. मात्र मुलाच्या बिघडलेल्या वागणुकीबद्दल प्रणिता यांनी पतीला सांगून पाहिले. परंतु पतीने याबाबत फार गांभीर्याने घेतले नाही. बिघडलेल्या मुलाने त्याच्या साथीदारांना आईचा काटा काढण्यासाठी ३ लाख २५ हजार रुपयांची सुपारी दिली. पकी १ लाख ७६ हजार रुपये महिनाभरात त्यांना पोहोचतेही केले.
पसे मिळाल्यानंतर परभणी जिल्हय़ातील पालम येथील लखन शिवाजी इवेदार, शुभम मस्के, वाजीद जिलानी शेख, नदीम ताहेर, विजय नागोराव इवेदार या पाच जणांनी खुनाचा कट रचला. यातील तिघे स्विफ्ट डिझायर गाडीने २६ मे रोजी दुपारी उदगीर येथे दाखल झाले. पेन्सलवार यांच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर गाडी लावून तिघे पायी पेन्सलवार यांच्या घरी पोहोचले. ठरल्याप्रमाणे त्यांचा मुलगा खालीच वाट पाहात थांबला होता. घरात जाऊन एसी दुरुस्तीच्या बहाण्याने या मुलांनी तीक्ष्ण हत्याराने प्रणिता पेन्सलवार यांची गळा चिरून हत्या केली.