X

महिला आरक्षणाच्या सोनिया गांधी यांच्या मागणीला भाजपच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षांचा पाठिंबा

पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना भाजपने महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये मांडले होते.

बहुमत असल्याने भाजप सरकारने महिला आरक्षण विधेयक मांडून ते मंजूर करुन घ्यावे, अशी विनंती कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली होती. त्याला अनुमोदन असल्याची भूमिका भाजपच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी व्यक्त केली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या उमेदवार म्हणून त्यांचे नाव सध्या चर्चेत आहे. ‘मी पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी घेतली आहे. पक्ष सांगेल तो आदेश मान्य असेल,’ असे त्या एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाल्या.

पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना भाजपने महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये मांडले होते. त्यामुळे या विधेयकाच्या विरोधात आमचा पक्ष नाही. हे विधेयक मंजूर व्हावे, अशी इच्छा आहेच. योग्य वेळ आल्यावर हे विधेयक निश्चितपणे मांडले जाईल, असा विश्वास व्यक्त करीत रहाटकर यांनी सोनिया गांधी यांच्या मागणीला पाठिंबा असल्याचे सांगितले.

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिला ग्रामसभांमध्ये महिलांनी सुचवलेली १० टक्के कामे जिल्हा वार्षिक योजनेत घेण्याचा ठराव मंजूर करावा, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गर्भलिंग चाचणी तसेच शाळाबा मुलींच्या शिक्षणाबाबत ठराव करण्याबाबतही महिला आयोगाने केलेल्या शिफारशी राज्य सरकारने मान्य केल्या असून तशा सूचना  यंत्रणांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपचा स्वतंत्र उमेदवार असेल काय आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीऐवजी भाजपने स्वतंत्र उमेदवाराचा विचार केला तर ती जागा कोणाला मिळणार याची चर्चा सुरू आहे.

त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा होती. या अनुषंगाने रहाटकर यांना विचारले असता त्यांनी, ‘पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल’ अशी भूमिका घेतली. विजया रहाटकर यांची पत्रकार बैठक सुभेदारी विश्रामगृहावर होती. ती संपता संपता खासदार चंद्रकांत खरेही विश्रामगृहावर अन्य कामासाठी आले होते. त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार रहाटकर असतील तर, असे विचारले असता ते म्हणाले,‘ हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गड आहे.त्यासाठी फार कष्ट करावे लागतात. यापेक्षा अधिक काय सांगू.’ पुढे तिरकसपणे म्हणाले, की मोदींच्या यादीत कोणाचे नाव आहे, हे देखील त्यांना विचारा.

वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain