News Flash

मका, कापसाचे क्षेत्र घटणार, सोयाबीन, तुरीची लागवड वाढणार

शेतकऱ्यांचा कल पाहता सोयाबीन, तुरीची लागवड अधिक क्षेत्रावर होईल, असे कृषी क्षेत्रातील अभ्यासकांकडून सांगितले जात आहे. 

प्रतिकात्मक छायाचित्र

कृषी अभ्यासकांचा अंदाज

औरंगाबाद : गत दोन वर्षांपासून मका पिकावर होत असलेला लष्करी अळीचा प्रादुर्भाव, घटलेला बाजारभाव आणि यंदा लागवडीसाठी मजुरीचे वाढलेले दर पाहता मक्याचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात घटण्याचीच चिन्हे दिसत आहेत. गत रब्बी हंगामात मक्याची सरासरीपेक्षा जवळपास अडीचशे टक्क्य़ांनी अधिक लागवड झाली होती. कापसाचेही क्षेत्र २० टक्क्य़ांनी कमी होण्याचा अंदाज असून शेतकऱ्यांचा कल पाहता सोयाबीन, तुरीची लागवड अधिक क्षेत्रावर होईल, असे कृषी क्षेत्रातील अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.

रोहिणी नक्षत्रातील पंधरा दिवसांपैकी आठ ते दहा दिवस बहुतांश भागात दमदार पाऊस झाला. मृग नक्षत्र लागताच अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवातही केली आहे. मात्र, यातील बहुतांश शेतकरी कापसाची लागवड करत असल्याचे चित्र असले तरी गतवर्षी लांबलेला पाऊस आणि त्याचा कापसालाही बसलेला फटका पाहता यंदाही कापूस मोठय़ा क्षेत्रावर लावण्याची मनस्थिती नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

यंदा मका पिकाकडेही शेतकऱ्यांचा लागवडीचा फारसा ओढा दिसत नाही. गत दोन वर्षांपासून मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत असून त्यामुळे मका लागवड करण्याच्या मनस्थितीत शेतकरी नाही. गतवर्षी मका पिकाला बाजारात दरही हजार ते अकराशे रुपये क्विंटलपर्यंतच मिळाला. याशिवाय करोनामुळे विदेशात जाणारा मका निर्यात होऊ शकला नाही. स्टार्च करणाऱ्या कंपन्यांकडूनही करोनाच्या पार्श्वभूमीवर मागणी नव्हती. परिणामी दर गडगडले होते.

औरंगाबाद विभागात औरंगाबाद, जालना व बीड हे तीन जिल्हे येत असून यामध्ये रब्बीचे एकूण ६ लाख ६४ हजार ३६ एवढय़ा सरासरी हेक्टर क्षेत्र होते. त्यापैकी ५ लाख ४१ हजार ६८२ म्हणजे ८१.५७ टक्के रब्बीचा पेरा झालेला आहे. त्यातील ९७.५३ हेक्टरवर मक्याची पेरणी झालेली होती. औरंगाबाद जिल्ह्य़ात लागवडीची टक्केवारी तब्बल २४७.६८ एवढी होती.

मक्याची लागवड जिल्ह्य़ातील सिल्लोड तालुक्यात अधिक होते. साधारण बाजारभाव ज्या पिकांना जास्त त्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मक्यावर अळीचा प्रादुर्भाव पडण्याची भीती असेल तर कृषी विभागही योग्य मार्गदर्शन करतो.

 – विशाल साळवे, मंडळ कृषी अधिकारी, पैठण

यंदाही पुन्हा लष्करी अळीच्या प्रादुर्भावाची भीती, बाजारभाव ज्या पिकांना अधिक त्याकडे होत असलेला ओढा व लागवडीच्या दृष्टीने वाढलेला मजुरीचा दर, यांच्याशी गणित जुळवून औरंगाबाद परिसरातील शेतकरी मका पिकाची लागवड करण्याच्या मनस्थितीत नसून त्याऐवजी उसाची लागवड करण्याच्या तयारीत आहेत. कारखान्याने ऊस खरेदी केला नाही तरी जनावरांसाठी कामी येईल. त्यालाही हजार ते बाराशे रुपये दर मिळतो.

विश्वंभर हाके, शेतकरी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 1:45 am

Web Title: soybean and pulses cultivation will increase in aurangabad zws 70
Next Stories
1 करोनाकाळात रेल्वेमार्गावर आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ
2 निवृत्त फौजदाराची ‘ऑनलाइन’ फसवणूक
3 करोना चाचणी अनिवार्य; व्यापाऱ्यांसाठी सात दिवसांची मुदत
Just Now!
X