जिल्ह्यत यंदा सोयाबीन बियाणांचा तुटवडा आहे. कृषी सेवा केंद्र चालकांकडे सोयाबीन- ३३५ या वाणाचे बियाणे काही प्रमाणात आहे. परंतु महाबीज कंपनीकडून एमएयू-७१ या बियाण्याचा तुटवडा असतानाही हे बियाणे राष्ट्रीय गळीत हंगाम धान्य अभियानांतर्गत अनुदानावर वाटप करण्यात येत आहे. अनुदानावरील बियाणे मिळविण्यासाठी खेडेगावातून येणाऱ्या शेतकऱ्यांचा अख्खा दिवस दुकानासमोर रांगेत उभा राहूनच जात आहे.

यंदा दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात काही ठिकाणी पावसाने हजेरीही लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पेरणीची आशा लागली आहे. मात्र, मागील तीन वर्षांपासून उत्पन्न मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात बियाणांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. किंमतीही मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकरी मोठय़ा प्रमाणात सोयाबीन पिके घेतात. त्यातच यावर्षी उसाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे ते क्षेत्र पेरणीसाठी वाढले आहे. त्यामुळे बियाणाचीही गरज वाढली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अल्पदरात बियाणे खरेदी करता यावे, यासाठी शासनाने राष्ट्रीय गळीत धान्य अभियान २०१६-१७ अंतर्गत महाबीज कंपनीकडून अनुदानावर सोयाबीन बियाणे देण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीनच्या १५ वर्षांच्या आतील सुधारित वाणाचे प्रकल्पअंतर्गत २४० व प्रकल्पाबाहेर ५ हजार ५३० िक्वटल बियाणे किंमतीच्या ५० टक्के किंवा जास्तीतजास्त २ हजार ५०० प्रतििक्वटल अनुदान वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पाच दुकानदारांकडे सदरील बियाणे वितरणासाठी ठेवण्यात आले आहे.