28 October 2020

News Flash

मराठवाडय़ात करोनाचा विळखा वाढताच!

२,७७३ जणांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

मराठवाडय़ातील करोना विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत असून ग्रामीण भागातील मृत्यूची संख्या शहरी भागातील मृत्यू संख्येपेक्षा अधिक झाली आहे.आतापर्यंत मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यात दोन हजार ७६६ जणांच्या मृत्यूपैकी शहरी भागातील संख्या १ हजार १०० असून ग्रामीण भागातील संख्या १६६६ एवढी आहे. मूत्युआलेख आणि  बाधितांच्या संख्येत ग्रामीण भागात वाढ होत असल्याचे दिसून येत असल्याने चिंता वाढल्या आहेत. मराठवाडय़ातील ग्रामीण भागात एक हजार १११ जणांना करोनाबाधा असून शहरी भागातील म्हणजे महापालिका क्षेत्रातील हे प्रमाण ५२२ एवढेच आहे. दिवसभरात सर्वाधिक १२ मृत्यू उस्मानाबाद जिल्ह्यात झाले. आठ जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ४३ पर्यंत गेली आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा शुक्रवारी सकाळी ८९९ पर्यंत पोहचला होता. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सात जणांचा मृत्यू झाला. दरम्यान वैजापूर तालुक्यातील एकाच घरातील पाच करोनाबाधितांचा ठराविक अंतराने  मृत्यू  झाला.

औरंगाबाद शहरातील मृत्यूवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू  आहे. औरंगाबाद शहरातील इंदिरानगर भागातील व्यक्तीचा अन्य कोणत्याही आजाराशिवाय केवळ कोविडमुळे मृत्यू झाला. मृत्युदर आणि संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सुविधा निर्माण करतानाच प्रबोधन आणि करोनाबाधितांनी तातडीने उपचारासाठी यावेत यासाठी प्रशासन पाऊले  उचलत आहे.  दरम्यान परभणीचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते आता ८२.७ एवढे आहे.  बीड जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.६२ एवढे असून ते मराठवाडय़ात सर्वात कमी आहे. ग्रामीण भागातील सुविधांचा अभाव, डॉक्टरांकडून करोनाबाधितांवर उपचार करताना औषधे वापरण्याचा अनुभव याचा परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते.

लातूरमध्ये करोनाबाधितांचा आकडा १५,५८७

जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा गुरुवारी सायंकाळी १५ हजार ५८७ वर पोहोचला असून आतापर्यंत १२ हजार सहाजण करोनामुक्त झाले आहेत, तर तीन हजार ७३ जणांवर जिल्ह्य़ातील विविध रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ४५१ वर पोहोचली आहे.

गुरुवारी सायंकाळी आलेल्या अहवालात नव्याने २९४ करोनाबाधितांची संख्या वाढली, तर २९१ जण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्य़ात दररोज सुमारे १२०० ते १५०० जणांच्या करोनाच्या चाचण्या होत असून त्यातील २५ ते ३० टक्के करोनाबाधित आढळत आहेत. १५ दिवसांपासून हे प्रमाण स्थिर आहे. काही केल्या करोनाच्या संख्येत घट होत नाही. सर्व व्यवहार आता खुले करण्यात आले असून करोनाबाधितांच्या जवळच्या १८ ते २० जणांच्या करोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्यांना गृहविलगीकरण करण्याचा सल्ला दिला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांचे प्रमाण कमी होत नसल्याने चिंतेत भर पडते आहे.

जालना जिल्ह्य़ात करोनाचा कहर ; ५८ डॉक्टरांना संसर्ग

सप्टेंबर महिन्यात जिल्ह्य़ात करोना रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. गुरुवारी दुपापर्यंत जिल्ह्य़ातील एकूण करोनाबाधितांची संख्या आठ  हजारांवर गेली असून त्यापैकी ४० टक्के रुग्ण सप्टेंबरमधील आहेत.

जिल्ह्य़ात आतापर्यंत ५८ डॉक्टर्स करोनाबाधित झाले आहेत. यापैकी ४४ डॉक्टर्स खासगी, तर १४ डॉक्टर्स शासकीय रुग्णालयांतील आहेत.  ९४ परिचारिका आणि अन्य कर्मचारीही करोनाबाधित झाले आहेत. यापैकी ४८ परिचारिका आणि अन्य कर्मचारी शासकीय रुग्णालयांतील आहेत.

करोनामुळे २०३ रुग्ण मृत्युमुखी पडलेले असून यापैकी १६० मृत्यू शासकीय रुग्णालयातील, तर ४३ मृत्यू खासगी रुग्णालयातील आहेत. एकूण रुग्णांत मृत्यूचे प्रमाण २.५५ टक्के आहे. जुलै महिन्यात ६६, ऑगस्टमध्ये ६८ तर सप्टेंबरमध्ये आतापर्यंत ४९ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झालेला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये १६४ रुग्ण ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आहेत. आरटीपीसीआर आणि प्रतिजन मिळून एकूण जवळपास ५० हजार चाचण्या आतापर्यंत जिल्ह्य़ात घेण्यात आल्या आहेत. यापैकी आरटीपीसीआर चाचण्यांतील करोनाबाधितांचे प्रमाण २३ टक्के, तर प्रतिजन चाचण्यांमधील प्रमाण पावणेआठ टक्के आहे.

मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राणवायूच्या ४० खाटांची व्यवस्था असणारे करोना समर्पित काळजी केंद्र सुरू करण्यात येत आहे, तर घनसावंगी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राणवायूची व्यवस्था असलेल्या २५ खाटा आणि पाच व्हेंटिलेटरची सुविधा करण्यात येत आहे. राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राणवायूची व्यवस्था असलेल्या ५० खाटांसह पाच व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करवून देण्याच्या संदर्भात आवश्यक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

पाच हजार व्यक्तींना दंड

सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी वापरली नाही तसेच अंतर नियमांचे पालन केले नाही म्हणून आतापर्यंत जालना जिल्ह्य़ात जवळपास पाच हजार व्यक्तींकडून ११ लाख ३२ हजार रुपयांपेक्षा अधिक दंडाची वसुली करण्यात आली आहे. मुखपट्टी, हातांची स्वच्छता त्याचप्रमाणे अंतरनियमांचे पालन जनतेने करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 12:09 am

Web Title: spread of corona increases in marathwada abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 अधिछात्रवृत्ती रखडल्याने ‘सारथी’च्या विद्यार्थ्यांची कोंडी
2 औरंगाबाद जिल्ह्य़ात संसर्ग रोखण्याची मोहीम
3 मद्यविक्रीत वाढ, तरीही महसूल कमी
Just Now!
X