पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून वाद ओढवून घेतलेल्या अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची शैक्षणिक कारकीर्दही पुस्तकांच्या खरेदीत गैरव्यवहाराच्या आरोपाने वादग्रस्त ठरल्याचे समोर आले आहे. सबनीस यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत त्यांच्यावर पुस्तकांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तौलनिक भाषा विभागाचे प्रमुख म्हणून काम करताना यूजीसीकडून केलेल्या खरेदीत त्यांनी लिहिलेली ६ पुस्तके व त्यांना भेट म्हणून आलेली २७ पुस्तके होती. या खरेदीत १० हजारांहून अधिक रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर चौकशी समिती नेमली गेली होती. या वादाच्या अनुषंगाने संमेलनाध्यक्ष सबनीस यांना विचारले असता, ‘हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात असून त्यावर बोलता येणार नाही,’ असे ते म्हणाले.
धुळे येथील विद्यावíधनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्यपदावर रुजू होण्यापूर्वी तौलनिक भाषा विभागाचे प्रमुख असताना सबनीस यांना अभिप्रायार्थ ‘सप्रेम भेट’ आलेली पुस्तकेही खरेदी करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला होता. यूजीसी प्रकल्पांतर्गत घेण्यात आलेल्या १०९ पुस्तकांची छाननी केल्यानंतर ६ पुस्तके त्यांनी लिहिलेली आणि २७ पुस्तकांवर अभिप्रायार्थ साहित्यिकांनी पाठविलेल्या पुस्तकाबाबतचे उल्लेख होते. भेट पाठविलेली पुस्तके विक्रेत्यांकडून कशी आली, याचा शोधही तक्रारकर्त्यांनी घेतला होता. या अनुषंगाने अधिसभा सदस्य प्रा. बाबा हातेकर यांनी विद्यापीठांच्या सभांमध्ये प्रश्नही उपस्थित केला होता. आणि त्या अनुषंगाने सबनीस यांची चौकशीही झाली होती. या संपूर्ण प्रकरणांबाबत फारसे बोलण्यास सबनीसांनी नकार दिला. या प्रकरणात काहीही तथ्य नाही. मी कोणतीही चूक केली नव्हती, असे ते म्हणाले.
पुस्तक खरेदी प्रकरणातील तक्रारकर्त्यांनी पुस्तकांच्या यादीसह कोणत्या पुस्तकावर कोणाची सही आहे आणि कोणाच्या अभिप्रायार्थ व कोणी सप्रेम पाठविली आहेत, याची माहितीही देण्यात आली होती. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पद मिळविणाऱ्या सबनीसांची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी मात्र वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त होती. ते वाद अजूनही न्यायालयात सुरू आहेत. पुस्तकांच्या गैरव्यवहाराबाबत तक्रार करणारे हातेकर म्हणाले, ती तक्रार फार पूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर चौकशीच्या फेऱ्यातून सुटण्यासाठीही सबनीसांनी बऱ्याच क्लृप्त्या केल्या होत्या. केवळ एवढेच नाही, तर सबनीस यांनी त्यांच्या पुस्तकात गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू व महात्मा फुले यांचीही बदनामी केली असल्याची एक तक्रार धुळे येथे दाखल करण्यात आली होती. २९ ऑक्टोबर २०१२ रोजी नारायण पुंडलिक सपकाळे, गेंदलाल नगर-जळगाव यांनी ही तक्रार दाखल केली होती. दलित मुक्तिसेनेचे राजू मोरे, डी. के. बनसोडे, प्रताप इंगळे, इरफान शेख यांनी सबनीसांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती. अनेक दिवसांपासून सबनीस यांच्या गैरव्यवहाराची कागदपत्रे अनेकांनी गोळा केली आहेत. त्यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीत आणि न्यायालयीन वादही दाखल आहेत.
‘कोणताही गैरव्यवहार नाही’
पुस्तक खरेदीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या आरोपात काहीएक तथ्य नाही. विद्यापीठाने केलेल्या चौकशीतही कोणताही ठपका ठेवलेला नाही. हा सर्व वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल आहे. अॅड. सतीश तळेकर माझे वकील आहेत. त्यामुळे या अनुषंगाने मला अधिक बोलायचे नाही.
– श्रीपाल सबनीस