दहावीच्या गणित विषयाची उत्तरपत्रिका सोडवताना सामूहिक कॉपी पुरवण्याचा प्रकार सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील स. भु. हायस्कूलमध्ये उघडकीस आला. या केंद्रावरील पर्यवेक्षक व शिक्षकांनी सामूहिक कॉपी पुरविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंडळाने या परीक्षा केंद्रांवरील सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मागविल्या आहेत. सामूहिक कॉपी झाली आहे काय, हे या उत्तरपत्रिकांच्या तपासणीनंतर स्पष्ट होईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. या केंद्रावरील दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाणार आहे.

सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथे स. भु. प्रशालेतील परीक्षा केंद्रास माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, जे. व्ही. चौरे, एम. आर. सोनवणे यांच्या भरारी पथकाने ११ मार्च रोजी भेट दिली. तेव्हा गणिताच्या प्रश्नांची उत्तरे असणारे ११० एकाच हस्ताक्षरातील कार्बनच्या सहाय्याने लिहिलेल्या प्रती त्यांना दिसून आल्या. या केंद्रावर ३२५ विद्यार्थ्यांपैकी ३२२ विद्यार्थी परीक्षा देत होते. परीक्षा केंद्रातून भरारी पथकाने शिक्षकांसह पर्यवेक्षक, केंद्र संचालक, सह केंद्र संचालकांवर कारवाई होणार असल्याचे समजते. या केंद्रातून भरारी पथकाने दोन पोते नवनीत गाइड, कोहिनूर, स्पार्क गाइड आदी साहित्य जप्त केले.

मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांच्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून आढावा घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

स. भु. ची नाचक्की
या प्रकरणाविषयी स.भु. संस्थेचे सहसचिव (ग्रामीण) अ‍ॅड. रामेश्वर तोतला म्हणाले,की घडलेला प्रकार धक्कादायक आणि गंभीर आहे. याविषयी आढावा घेऊन संबंधितांवर संस्था कडक कारवाई करणार आहे. दरम्यान, या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात नावलौकिक आणि पारदर्शी कारभारामुळे दरारा असलेल्या स. भु. शिक्षण संस्थेची या प्रकारामुळे नाचक्की झाली असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

भूगोल पेपरला ४२ कॉपीबहाद्दर!
मंडळातर्फे सुरू असलेल्या बारावीच्या भूगोल विषयाच्या परीक्षेत औरंगबाद विभागात ४२ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यत सात आणि बीड जिल्ह्यत ३५ कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत ३०१ जणांना कॉपी करताना पकडण्यात आले आहे.