21 August 2019

News Flash

एस. टी. कामगारांच्या संपाचा मराठवाडय़ात प्रवाशांना फटका

पगारवाढीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे एस. टी. बस जागेवर, तर संपामुळे खासगी प्रवासी वाहतूक जोरात असे चित्र औरंगाबादसह मराठवाडय़ातील सर्वच जिल्ह्य़ांत गुरुवारी पाहावयास मिळाले.

पगारवाढीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे एस. टी. बस जागेवर, तर संपामुळे खासगी प्रवासी वाहतूक जोरात असे चित्र औरंगाबादसह मराठवाडय़ातील सर्वच जिल्ह्य़ांत गुरुवारी पाहावयास मिळाले. मात्र, त्याचा सर्वच प्रवाशांना मोठा फटका बसला.
संपामुळे सकाळपासूनच सर्वच आगारांतून एकही बस सुटू शकली नाही. बाहेरून रोज प्रवास करणारे नोकरदार, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, रुग्ण, वृद्ध या सर्वच प्रवाशांचे संपामुळे चांगलेच हाल झाले. त्यातच खासगी वाहतूकदारांनी नेहमीपेक्षा अधिकचे भाडे आकारून जादा कमाई केली. मात्र, या आर्थिक पिळवणुकीने प्रवासी चांगलेच हैराण झाले. बहुतेक जिल्ह्य़ांत एस. टी. कामगार संपामुळे आक्रमक झाले होते. तुरळक ठिकाणी संपाचा जोर वाढविण्यासाठी बसमधील हवा सोडून देण्यात आली. औरंगाबादच्या मध्यवती व सिडको बसस्थानकांतून एकही बस सुटली नाही. मात्र, दोन्ही स्थानकांत बसची वाट पाहत मोठय़ा संख्येने प्रवासी बसून होते. दूरच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना संपाचा फटका बसला. यातील बहुतेक प्रवाशांनी खासगी वाहतुकीचा आधार घेतला. मात्र, संपामुळे वाढलेला गर्दीचा ओघ पाहून खासगी वाहतूकदारांनीही नेहमीपेक्षा जास्त दराने भाडे आकारून मोठी कमाई केली. संपामुळे आगार, बसस्थानकांच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आल्याने ही खासगी वाहने प्रवाशांना खचाखच भरून वाहतूक करीत होती. बाहेरगावी जाणाऱ्यांचे व येणाऱ्यांचे संपामुळे व प्रवासाचे जादा भाडे द्यावे लागल्याने त्रासून गेले होते.

First Published on December 18, 2015 1:40 am

Web Title: st worker strike