23 October 2018

News Flash

भीमा कोरेगावच्या दुर्घटनेस राज्य सरकारच जबाबदार : धनंजय मुंडे

कायदा व सुव्यवस्था राखण्यात गृहखाते अपयशी

धनंजय मुंडे

औरंगाबाद : भिमा कोरेगावला घडलेली दंगल हे राज्य सरकार व गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे अपयश असून या घटनेस राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेते विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात दुर्लक्ष का झाले? राज्य सरकार म्हणून तुम्ही काय करत होतात? असे सवालही मुंडे यांनी उपस्थित केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठवाडय़ात होणाऱ्या हल्लाबोल यात्रेच्या तयारीसाठी महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे रविवारी परभणी, हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीपूर्वी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली.

‘भाजपचे जबाबदार समजले जाणारे शाम जाजू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाच्या बाबतीत बोलणे हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे. भाजपला जातीय तेढ निर्माण करायची असून मागील साडे तीन वर्षांत हेच दिसून आले आहे. भिमा कोरेगाव प्रकरणी झालेली दंगल हे सरकारचे अपयश असून जातीय तेढ निर्माण करणारे कोण आहेत? हे सरकारला माहीत नाही का? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला.

गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्याचे हे अपयश आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम सरकारचे असून या दंगलीला जबाबदार असलेले कुठल्याही जातीचे, पक्षाचे, संघटनेचे असोत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असल्याचे मुंडे म्हणाले. तसेच याप्रकरणात माध्यमांना बोलण्यापेक्षा रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना बोलावे असा टोलाही मुंडे यांनी लगावला. राज्य सरकारने भिमा कोरेगाव दंगलप्रकरणी भुमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली.

First Published on January 7, 2018 10:52 pm

Web Title: state government responsible for the accident of bhima koregaon says dhananjay munde