राज्य महिला आयोगाचे सरकारला निर्देश

तुळजापूर प्रकरणानंतर मनोधैर्य प्रकरणातील १ हजार १९४ महिलांना मदतीसाठी तरतूद करावी, असे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी राज्य सरकारला दिले आहेत. बलात्कार प्रकरणातील सर्व पीडित महिलांना मदत देण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, यासाठी त्यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेटही घेतली. दरम्यान, तुळजापूर प्रकरणातील पीडित मुलींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपयांची मदत दिली आहे. तसेच या मुलींवर होणाऱ्या उपचाराचा खर्चही राज्य सरकार करणार आहे.

राज्यातील पीडित महिलांना केवळ तरतूद नसल्याने मदत मिळू शकत नसल्याचे ‘लोकसत्ता’ ने उघडकीस आणल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यासह सर्व महिला संघटनांनी सरकारकडे निधीची मागणी करण्यास सुरुवात केली. किमान संवेदनशील विषयात तरी पुरेशी तरतूद करणे आवश्यक असल्याचे सांगत सरकारवर टीका होत असल्याने महिला आयोगाने या प्रकरणात लक्ष घातले आहे. मनोधर्य योजनेतून प्रत्येक पीडित मुलीस ३ लाख रुपये मदत मिळावी, असे अपेक्षित होते. केवळ पैसे नसल्याने तुळजापूर तालुक्यातील मजूर दाम्पत्याला त्यांच्या लहान मुलीवर उपचार करता आले नव्हते.

यंत्रणेचा पाशवी चेहरा उघडकीस आल्यानंतर संवेदनशील व्यक्तींनी मुलीला मदत करण्यासाठी हात पुढे केले. गेल्या तीन दिवसांत या मुलींच्या पालकांना सव्वा लाख रुपयांची मदत मिळाली आहे. राज्य सरकारलाही या प्रकरणात जाग आल्याने मुख्यमंत्री सहायता निधीतून काही रक्कम देण्यात आली. दरम्यान, एवढय़ावर प्रश्न सुटणार नसल्याने आर्थिक मदतीसाठी राज्य सरकारने तातडीने तरतूद करण्याचे निर्देश महिला आयोगानेही दिले आहेत.

या अनुषंगाने आज विजया रहाटकर यांनी महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली.