मोटारीत लसीकरणाची सुविधा

औरंगाबाद : करोना लशीच्या दोन मात्रांमधील अंतर ८४ दिवसांवर गेल्याने तसेच तीन लाखांहून अधिक ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांचे लसीकरण झाल्याने आता शहरात तीस हजार लस उपलब्ध आहे. त्यामुळे कारमधून या आणि लस घ्या असा नवा कार्यक्रम महापालिकेकडून घेण्यात आला आहे. तसेच १८ वर्षे वयाच्या विकलांग व्यक्तींचे लसीकरण केले जात आहे. महापालिकेकडे नोंदलेली ही संख्या केवळ तीन हजार असली तरी ही संख्या अधिक असू शकते. त्यामुळे लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडाळकर यांनी केले आहे.

लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेऊन लस घेण्यास येणाऱ्या भीती वाटत असेल, तर कारमध्ये येणाऱ्यांनाही लस दिली जाणार आहे. ‘ड्राइव्ह इन’ ही लसीकरण मोहीम प्रोझोन मॉलच्या वाहनतळात सुरू करण्यात आल्याचे डॉ. पाडाळकर म्हणाल्या. आता लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद काहीसा कमी झाला असून लस शिल्लक राहत आहे. पण लशीची मात्रा वाया जात नाही. पुरेशी संख्या झाल्यानंतरच लस बाहेर काढली जाते. एका वेळी किमान दहा जण तरी लसीकरणासाठी लागतात.

जेष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर ताटकळत थांबावे लागू नये याकरिता मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी ड्राइव्ह इन ही संकल्पना राबविण्याची सूचना केली होती. त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कारमध्ये लस देण्याची सोय करण्यात आली आहे.