पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश

औरंगाबाद : ग्रामीण भागात वाढत असलेल्या करोनाच्या रुग्णांची वाढ रोखावी. त्यासाठी एका रुग्णामागे त्याच्या संपर्कात आलेल्या किमान १५ व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी करावी, असे निर्देश देत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यासंदर्भाने मनुष्यबळ व निधीची उपलब्धता करून देण्यात येईल, असे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात करोनासह इतर मुद्दय़ांवर पालकमंत्री देसाई यांनी बैठक घेतली. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. नीता पाडाळकर आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील रुग्णवाढ रोखण्यासाठी प्रतिजन चाचण्या वाढवाव्यात, लोकांचे कॉन्टॅक्ट मॅपिंग करावे, फिवरची संख्या वाढवावी, कोविड केअर सेंटर अधिक अद्ययावत करावेत, चाचणी गावच्या सीमेवरच झाली पाहिजे, गावकऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने गावबंद करून बाहेरून येणाऱ्यास प्रतिबंध केला पाहिजे, असे पालकमंत्री देसाई म्हणाले.

बाधितांचा आकडा चढाच!

औरंगाबाद शहरातील करोना विषाणूचा कहर अजूनही सुरू आहे. तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे सर्दी पडसे याचे रुग्णही वाढू लागले आहेत. त्यामुळे कोणता रुग्ण करोनाचा यासाठी प्रत्येकाची चाचणी करणे आवश्यक बनू लागले आहे. दरम्यान स्वातंत्र्य दिनी करोना रुग्णांची संख्या ३०६ ने वाढली होती. त्यात रविवारी २२३ रुग्णांची भर पडली.  तर मृत व्यक्तीचा आकडा आता ५८७ एवढा झाला आहे. दरम्यान विषाणूच्या वाढीला पुरक हवामान निर्माण झाले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेवराई तालुक्यातील बरामगाव येथील ५० वर्षीय पुरुष, पैठण येथील भवनीनगर भागातील ६५ वर्षी महिला तसेच हडको भागातील एन-९, राशीदपुरा भागातील ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू  झाला. गंभीर स्थितीमधील १६० जणांवर उपचार सुरू आहेत. घाटी रुग्णालयात आतापर्यंत ४३७ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणाचे अहवाल २० ऑगस्टपर्यंत मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर करोना हाताळणीमध्ये काही धोरणात्मक बदल होण्याची शक्यता आहे.

नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांत २९१ नवे रुग्ण

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये करोना संसर्ग झालेले २९१ रुग्ण आढळून आल्यानंतर बाधित रुग्णांची संख्या ४ हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या दोन दिवसांत ८ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या १४७ झाली आहे. स्वातंत्र्यदिनी म्हणजे शनिवारी जिल्ह्यात १९६ रुग्णांचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आला होता. त्याचवेळी ८७ करोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर दवाखान्यातून सुटी देण्यात आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी रुग्णालयातून सुटी मिळालेल्या रुग्णांची संख्या १०२ होती; पण दुसऱ्या बाजूला आणखी ९५ बाधित रुग्णांची भर पडल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ४ हजार १०६ झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच कोविड उपचार केंद्रांमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १ हजार ५१८ असून त्यात गंभीर प्रकृती असलेल्यांची संख्या १९३ झाली आहे.

परभणी जिल्ह्यात ६३ करोनाबाधित

परभणी जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरूच असून आज रविवारी  सायंकाळपर्यंत  जिल्ह्यात  एकूण ६३ बाधितांची भर पडली. यात  शहरातील २८, पालम १६, जिंतूर ११, गंगाखेड  ६ आणि सोनपेठ येथील २ रुग्णांचा समावेश आहे. जलद अँटीजेन चाचण्यांमध्ये हे ६३ रुग्ण आढळले आहेत. परभणी शहर महापालिकेच्या वतीने आज  शहरातील १३ केंद्रावर १ हजार १७ व्यापाऱ्यांसह विक्रेते यांची जलद चाचणी करण्यात आली . एकूण जी तपासणी झाली त्यात  ९८९ जण नकारात्मक तर २८ सकारात्मक सापडले.

सेरोअंतर्गत ४ हजारांवर नमुन्यांची तपासणी

शहरात शासकी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली आहे. सेरो सर्वेक्षणातून ४ हजार ५०० नमुन्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त पाण्डेय यांनी सांगितले. १६ हजार मोबाइल फिवर क्लिनिक कार्यरत असून शहरातील दूध, भाजी, किराणा विक्रेत्यांची प्रतिजन चाचणी करण्यात आल्याने रुग्णसंख्या वाढीस प्रतिबंध करण्यात आल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.

रुग्णसंख्येत वाढ

औरंगाबाद जिल्ह्य़ात रविवारी ९६ रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत १८ हजार ६६१ एवढी एकूण रुग्णसंख्या असून त्यापैकी १३ हजार सहाशेंवर रुग्ण करोनामुक्त झालेले आहेत. सध्या ४  हजार ४३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.