मुखेडच्या आबादीनगर तांडय़ावर मुलांना जुंपून पेरणी

सुहास सरदेशमुख लोकसत्ता

औरंगाबाद : मुखेडमधील तांडय़ाचे नाव आबादीनगर. गावाच्या नावातच तेवढी श्रीमंती. जमीन पूर्णत: माळरान. खडकाळ म्हणावी एवढी वाईट. पेरले तर उगवणार किती याचे उत्तर तसे मिळतच नाही. पण आशा मोठी म्हणून सखुबाई माधव चव्हाण यांनी एकरभरापेक्षा कमी रानात आपली दोन्ही पोरं अक्षरश: जुंपली. अजय आणि विजयच्या मदतीने आता बियाणे पेरले आहे. पण त्यासाठी त्यांना करावी लागणारी कसरतही अपार कष्टाची आणि मानहानीची. दारिद्रय़रेषेचा रेशनकार्डावरील पिवळा रंग लग्न झाल्यापासून चिकटलेल्या सखुबाईचे पती चार वर्षांपूर्वी वारले. त्यांच्या हयातीमध्येही पेरणीसाठी उधारी ठरलेलीच. या वर्षी सखुबाईंनी गावातील सख्ख्या बहिणीकडून तीन हजार रुपये हातउसने घेतले. तिला बिचारीला पीककर्ज वगैरे असे शब्दही माहीत नाहीत. पण पाऊस झाला आहे आणि सखुबाईनी रान पेरले आहे. किती उगवेल, काय उगवेल हे कोणालाच सांगता येत नाही. गरीब परिस्थितीत मार्ग काढावा लागेलच असे मात्र त्या सांगतात.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

या वर्षी पीककर्ज मिळण्याची शक्यता असतानाही मागणी पुरेशी नसल्याने काही जिल्ह्यात नवीन मागणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण शासकीय पातळीवरील निर्देश सखुबाईंसारख्यापर्यंत पोहोचतच नाही. स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या अन्नधान्याशिवाय त्यांना कधीच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ झाला नाही. सरपंच गणपत चव्हाण म्हणाले, या महिलेचा नवरा वारल्यानंतर निराधार योजनेत त्यांची फाइल केली होती. पण दोन वर्षे ती तशीच पडून आहे. त्यामुळे सरकारी योजना काही तांडय़ावर पोहोचली नाही. नावातला ‘आबादी’ उतरावा म्हणून आम्ही कागद पाठवतो पण पुढे काही घडत नाही. सखुबाईचा कष्टावर भरवसा आहे. एक एकरपेक्षा कमी शिवारात त्यांनी त्यांची दोन मुले जुंपली. तत्पूर्वी मुखेडला जाऊन ५०० रुपयांचे बियाणे आणले. १ हजार ८०० रुपयांची युरियाची पिशवी आणली. गावापर्यंत येताना आणि ऑटोरिक्षा वाल्याने ५० रुपये घेतले. उसनवारीची रक्कम आता संपली आहे. आता पावसावर भरवसा. गेल्या वर्षी झालेल्या दीड पोते जोंधळ्यावर सारे चालले आहे. एक मुलगा दहावीपर्यंत शिकला. दुसरा सातवीमध्ये आहे. एका मुलीस सातवीनंतर शाळेत पाठविणे सखुबाईने बंद केले. आता मिळेल तिथे मजुरी करायची आणि जगायचे. करोनामुळे आता मजुरी मिळणे अवघड झाले आहे. पण जगायचे असेल आणि पाऊस झाल्याने पेरावे तर लागेलच. मुखेडमधील खळकाळ जमिनीतून पेरलेली ही आशा जिवंत राहील काय, हे मात्र पावसावर अवलंबून असेल. गेल्या काही वर्षांत पेरणीयोग्य क्षेत्रात राज्यात घट झाल्याची आकडेवारी आहे.