25 January 2021

News Flash

१० लाख टन साखर उत्पादन कमी करण्याची व्यूहरचना

कारखान्यांची भिस्त आता इथेनॉलवरच

(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख

देशातील २५४ साखर कारखान्यांतून निर्माण होणारी ४४ मेट्रिक टन साखर कमी करून शर्करांश अधिक असणाऱ्या ‘ब’ दर्जाच्या मळीपासून इथेनॉल निर्मिती वाढविण्यावर भर देण्याचे धोरण या वर्षी हाती घेण्यात आले आहे. राज्यातील ११७ प्रकल्पांतून इथेनॉल वाढीसाठी केंद्राच्या नव्या धोरणाचा लाभ घेण्यासाठी राज्य साखर संघाकडून विशेष उद्बोधन कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.

इंधनामध्ये इथेनॉल मिसळण्याचे पाच वर्षांचे धोरण ठरले असल्यामुळे राज्यात उत्पादित होणारी दहा लाख टन साखर कमी व्हावी आणि त्याऐवजी इथेनॉलनिर्मिती व्हावा अशी रचना केली जात आहे. इथेनॉल उत्पादन करणाऱ्या प्रकल्पाला नव्याने दिलेले कर्ज तेल कपंन्या थेट बँकांकडे जमा करण्याची कार्यपद्धती स्वीकारल्यामुळे साखर कारखाने वाचवायचे असतील तर इथेनॉलवरच भिस्त आहे. त्यामुळे इथेनॉल वाढवा असे धोरण राज्य साखर संघाने घेतले असल्याची माहिती अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

देशभरात ३१० लाख मेट्रिक टन साखर उत्पादित होते. गरज मात्र २५० लाख मेट्रिक टन एवढी आहे. त्यामुळे साखरेचे दर नेहमीसारखेच राहतील. परिणामी साखर कारखान्याचे अर्थकारण नेहमीच तोटय़ात असू शकते. त्यातून वाचायचे असेल तर साखर उत्पादन कमी करायचे आणि इथेनॉल उत्पादन वाढविणे अपरिहार्य झाले आहे. या अनुषंगाने केंद्र सरकारनेही पुढील पाच वर्षांचे धोरण हाती घेतले आहे. २०२२ पर्यंत दहा टक्के आणि २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल इंधनात मिसळण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण पुरेसे उत्पादन होत नसल्याची आकडेवारीतून दिसून येते. २०१८-१९ मध्ये ३२९ कोटी लिटरची मागणी होती पण उत्पादन झाले २६८ कोटी लिटर. तर त्याच्या पुढील वर्षांतही पुरेसे उत्पादन होऊ शकले नाही. त्याला मराठवाडय़ातील दुष्काळ, उसाची उपलब्धता ही कारणे होती. २०१९-२० मध्ये ५११ कोटी लिटरची मागणी असताना केवळ १७४ कोटी लिटरच इथेनॉलचा पुरवठा होऊ शकला. त्यामुळे इथेनॉल उत्पादनात वाढ करण्याची व्यूहरचना आता केली जात आहे.

राज्यात ११७ इथेनॉल निर्मिती प्रकल्पांपैकी ४० साखर कारखाने सहकारी तत्त्वावरची तर ४२ कारखाने खासगी आहेत. याशिवाय ३५ प्रकल्प अल्कोहोलपासून इथेनॉल निर्मितीही करतात. अल्कोहोलमधील पाण्याचा अंश काढून घेऊन १०० टक्के अल्कोहोल म्हणजे इथेनॉल तयार करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाणार आहे. शर्करांश असणारी ‘ब’ दर्जाची मळी वापरून इथेनॉल निर्मिती वाढविल्यास प्रतिटन १.२५ किलो साखरनिर्मिती कमी होते. साखर विक्रीसाठी लागणारा वेळ आणि त्यावरील व्याज याचा विचार करता इथेनॉलशिवाय पर्याय नाही, असे चित्र पुढील काळात दिसत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी इथेनॉलकडे वळवावे असे प्रयत्न सुरू केले असल्याचे दांडेगावकर आवर्जून सांगतात.

इथेनॉलचे दर

साखरेपासून इथेनॉल दर – ५९.१३ पैसे

बी हेव्ही मोलॅसिस (अधिक शर्करांश असणारी मळी)- ५२.१३ रुपये

सी मोलॅसिस (साखर काढून घेतल्यानंतरची मळी)- ४३.४६ रुपये

उसाच्या रसापासून इथेनॉल- ४७.५०

इथेनॉल मागणीचा अंदाज

( आकडे कोटी लिटर्समध्ये)

’२०२१         ४६५

’२०२१ ते २२    ४७०

’२०२२ ते २३    ५००

’२०२३ ते २४    ५४०

’२०२४ ते २५    ५८०

साखरेचे दर, शेतकऱ्यांना द्यावा लागणारा उसाचा दर, साखर कारखाना चालविण्यासाठी घेतलेले कर्ज त्यावरील व्याज याचा विचार करता पुढील काळात साखर उत्पादन कमी करणे अत्यावश्यक आहे. या वर्षी पाऊस अधिक आहे. त्यामुळे ऊस अतिरिक्त आहे. अशा स्थितीमध्ये केवळ साखर उत्पादनाने अर्थकारण सुधारणार नाही तर इथेनॉल वाढविणे ही काळाची गरज आहे. हा संदेश राज्यातील साखर कारखान्यांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. ज्यांना नव्याने इथेनॉल निर्मिती क्षेत्रात उतरायचे असेल त्यांना कर्ज सुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे इथेनॉलवरच साखर कारखान्यांच्या अर्थकारणाची भिस्त असणार आहे.

– जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राज्य साखर महासंघ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:14 am

Web Title: strategy to reduce sugar production by 10 lakh tonnes abn 97
Next Stories
1 औरंगाबाद शहरात २५ टक्के घरे पडून
2  नाथसागरचे १२ दरवाजे दीड फुटांनी वर उचलले
3 औरंगाबादेतील करोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या आठशेंवर
Just Now!
X