News Flash

स्ट्रेचर नसल्याने महिलेची लिफ्टजवळ प्रसूती, फरशीवर पडल्याने नवजात बालकाचा मृत्यू

या घटनेने घाटी रुग्णालयातील दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. 

प्रतिकात्मक छायाचित्र

स्ट्रेचर न मिळाल्याने औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात एका महिलेला चालतच लिफ्टपर्यंत जावे लागले. या दरम्यान लिफ्टजवळच महिलेची प्रसूती झाली आणि नवजात बालक फरशीवर पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने घाटी रुग्णालयातील दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. संतापजनक बाब म्हणजे रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणात जबाबदारी झटकून त्या मातेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.

औरंगाबादमधील एका महिलेला मंगळवारी संध्याकाळी प्रसूतीकळा सुरु झाल्या. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला आधी एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तिथे गेल्यावर कळा थांबल्याने महिलेला पुन्हा घरी पाठवण्यात आले. रात्री उशिरा महिलेला पुन्हा प्रसूतीकळा सुरु झाल्या. कुटुंबीय तिला घेऊन पुन्हा रुग्णालयाच्या दिशेने निघाले. घाटी रुग्णालय येईपर्यंत महिलेला प्रसूतीकळा असह्य झाल्या. शेवटी तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घाटी रुग्णालयात स्ट्रेचर नव्हते. त्यामुळे महिलेला चालतच लिफ्टपर्यंत जावे लागले. लिफ्टजवळच महिलेला प्रसूती झाली आणि नवजात बालक जमिनीवर पडले. यात त्या बालकाचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने महिलेच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. सोनाली खाटमोडे असे या मातेचे नाव असून त्या छावणी परिसरात राहतात.

घाटी रुग्णालयातील अधीक्षक डॉ. कैलाश झिने यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, या प्रकरणात आम्ही कागदपत्रांची पूर्तता न करता आधी महिला रुग्णाला उपचारासाठी दाखल करुन घेतले होते. बऱ्याचदा स्ट्रेचर उपलब्ध असतात. एखाद्या वेळी कर्मचारी दुसऱ्या रुग्णाला घेऊन गेलेले असतील नातेवाईक आणि रुग्ण कधी कधी पायीच जातात. या घटनेतही नातेवाईकांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला. लिफ्टजवळ महिलेची प्रसूती झाली आणि ती खाली बसली. स्ट्रेचर नसल्याने बाळाचा मृत्यू झाला असे म्हणणे योग्य ठरणार नाही. कधी कधी प्रसूती दरम्यानही बाळाचा मृत्यू होऊ शकते, असे उत्तर देत झिने यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

या प्रकरणी आता चौकशी समिती नेमण्यात आली असून या समितीमध्ये अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, अधीक्षक डॉ. कैलास झिने आणि डॉ. सोनाली देशपांडे यांचा समावेश आहे.

२०१८ मध्येही महिलेची अपघात विभागाबाहेर झाली होती प्रसूती
घाटी रुग्णालयात अशा स्वरुपाची घटना २०१८ मध्येही घडली होती. जून २०१८ मध्ये अपघात विभागाबाहेर महिलेची प्रसूती झाली होती. त्यावेळीही चौकशी समिती नेमण्यात आली होती. मात्र, या समितीचे पुढे काय झाले, हे अजूनही समजू शकलेले नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 10:24 am

Web Title: stretchers not available at ghati hospital mother lost his new born baby
Next Stories
1 चमत्काराने बेपत्ता व्यक्ती शोधण्याचा दावा; जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
2 विकेट घेण्यासाठी कसा बॉल टाकायचा हे चांगलेच माहित आहे – धनंजय मुंडे
3 कैद्याचा मृत्यू; ४८ तासांनंतर मृतदेहाचा स्वीकार
Just Now!
X