औरंगाबाद : औरंगाबाद शहरात शुक्रवारपासून सायंकाळी पाचनंतर रात्री अकरापर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १९ एप्रिलपर्यंत ही कडक संचारबंदी लागू राहणार असल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी कळवले आहे.

मागील आठवडय़ातही सायंकाळी पाच नंतर कडक संचारबंदी लागू करण्यात आली होती. या कालावधीत सायंकाळी जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद राहतील. औरंगाबादेत करोनाबाधित रुग्णांची संख्या मागील तीन दिवसांत वाढली आहे, तर आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. वाढते रुग्ण आणि नागरिकांकडून विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी कडक करण्यात आली असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. शहरात गुरुवारी व शुक्रवारी मिळून तोंडाला मास्क न लावणाऱ्या ८० जणांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुकान उघडे ठेवून मास्क न लावता सामाजिक अंतरही न पाळणाऱ्या दुकानदारांविरुद्घ सिडको, सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून सामुदायिक अन्नदानाचा उपक्रमही राबविण्यात येत आहे. पुंडलिकनगरचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले की, शुक्रवारी हर्सूल भागातील गरजू, गरीब, कामगारांना जेवणाचे डबे पोहोचवण्याचे काम करण्यात आले आहे. पोलिसांच्या कम्युनिटी अन्नदान उपक्रमांतर्गत हे काम शहराच्या वेगवेगळ्या भागात सुरू आहे. दररोज प्रत्येक भागातील गरजूंच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्या वाहनधारकांविरुद्घ कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, निरीक्षकही बाहेर पडले आहेत. या विभागाची १२ पथके रस्त्यावर फिरत असून १०० च्या वर रिक्षाचालकांवर त्यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे.