औषध दुकाने वगळता सर्व बंद

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात सायंकाळी सातनंतर रात्री बारापर्यंत कडक टाळेबंदीचे आदेश पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बुधवारी सायंकाळी काढले.  शहरात पोलिसाला झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी अधिक कडक केली जाईल, असे पोलीस विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

या संदर्भात पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी सांगितले, की पोलीस आयुक्तांचा आदेश हा बुधवार व गुरुवापर्यंत प्रायोगिक तत्त्वावर काढण्यात आलेला होता. त्यादरम्यान, काय-काय अडचणी तयार होऊ शकतात, याचा आढावा या दोन दिवसांत घेण्यात आला. हा प्रयोग पुढेही चालू ठेवण्याचा विचार सुरू आहे. सायंकाळी सात ते रात्रीपर्यंतच्या कडक संचारबंदीच्या काळात शहरात औषधी दुकान वगळता अन्य किराणा मालासह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, पिठाच्या गिरण्या, भाजीपाला-फळे विक्री करणाऱ्या हातगाडेवाल्यांनी व्यवहार बंद ठेवावेत. परिणामी नागरिक घरातून बाहेर येणार नाहीत, या अनुषंगाने कडक टाळेबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत, असे उपायुक्त मकवाना यांनी सांगितले.

दरम्यान, कडक टाळेबंदीकाळ सुरू होण्याच्या पाच मिनिट अगोदर पोलिसांनी मोठा सायरन वाजवण्याची व्यवस्था करावी. ज्यामुळे दुकानदारांना कळेल आणि नागरिकांनाही त्याबाबत माहिती होईल. त्यामुळे कुटुंबीय मुलांनाही बाहेर पडू देणार नाहीत, अशी सूचनावजा विनंती पैठणच्या प्रतिसाद संघटनेने केली आहे. पैठणमध्ये यापूर्वी १९८८ साली टाळेबंदीकाळात सायरन वाजवला जायचा, असे स्मरणही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी करून दिले आहे.

मातृत्वाआधी करोनाचे कर्तव्य

औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व शहर पोलिसातील पाच महिला उपनिरीक्षकांसह दहा ते बारा महिला कर्मचारी सध्या आपल्या मातृत्वाला बाजूला सारून करोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी देण्यात आलेले कर्तव्य प्राधान्य बजावत असल्याचे दिसते आहे. दामिनी पथकाच्या वर्षांराणी आजले, स्नेहा काटेवाड, लाड पारपत्र कार्यालयातील सुजाता राजपूत व सातारा पोलीस ठाण्यातील अनिता फसाटे या पाच उपनिरीक्षक महिलांची मुले-मुली दोन वर्षांच्या आतील असून त्यांचे संगोपन करताना करोना विषाणूचा फैलाव होणार नाही, यासाठी स्वत:सह मुलांचीही काळजी घेत आहेत. दिवसभर कर्तव्य बजावल्यानंतर सायंकाळी घरी गेल्यानंतर मुलगा रडत असला तरी आधी स्वच्छ  होऊनच नंतर त्याला जवळ घेतले जात असल्याचे वर्षांराणी आजले यांनी सांगितले. तर ग्रामीणच्या अधीक्षक मोक्षदा पाटील यांचाही मुलगा पाच-सहा वर्षांचा असून ग्रामीण भागात दौरा करून आल्यानंतर योग्य ती स्वच्छता करूनच मुलास जवळ घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

बाजारस्थळांचे विलगीकरण

भाजीपाल्याच्या बाजाराच्या ठिकाणी होत असलेली गर्दी लक्षात घेता औरंगाबाद व पैठणमध्ये मोकळ्या मैदानांवर बाजार भरवण्यात येत आहेत. त्यामुळे गर्दीवर काही प्रमाणात आळा बसला जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. औरंगाबाद शहरात जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी मुख्य बाजार भरतो. मात्र, सकाळी सहापासूनच तेथे होणारी गर्दी लक्षात घेऊन काही दिवस जळगाव रोडवर ग्रामीण भागातून भाजीपाला घेऊन आलेल्या विक्रेत्यांना बसवण्यात आले. आता सिडकोतील रामलीला मैदान, आमखास मैदान, हडकोतील फरशी मैदान आदी ठिकाणी बाजारांच्या स्थळांचे विलगीकरण करण्यात आले. पैठणमध्येही मुख्य भाजीबाजार इतरत्र हलवण्यात आले आहेत. हुतात्मा स्मारक, गागा भट चौक, नवीन पैठण दसरा वेस, जुन्या पैठणमधील तहसील कार्यालय या भागात बाजार भरवण्यात येत आहेत. त्यामुळे गर्दीवर आळा बसून करोनाचा फैलाव रोखण्यास मदत होईल असे तालुका प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.