News Flash

अत्यावश्यक सेवा दुकानांबाबतही औरंगाबादमध्ये कडक निर्बंध?

अत्यावश्यक सेवेतील दुकानेही दुपारी एक वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला

(संग्रहित छायाचित्र)

औरंगाबाद : किराणा, औषधी, भाजीपाला, बेकरी आदी अत्यावश्यक सेवांवरही कडक निर्बंध आणण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. अत्यावश्यक सेवेत मोडणारी दुकाने दुपारीपर्यंतच खुली ठेवण्याच्या संदर्भाने लवकरच आदेश निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भातील संकेत पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिले असून त्यांनी नागरिकांनी विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

औरंगाबाद शहरातील विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी सध्या करोना चाचणी करण्याचा पर्याय काढण्यात आला आहे. सुमारे ६० ठिकाणी ही चाचणी करण्यात येत आहे. नाहक बाहेर पडणाऱ्या नागरिकांना समजावण्यासाठी शनिवारी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता हेही रस्त्यावर उतरले होते. हर्सूल टी पॉइंटसह शहराच्या इतर ठिकाणी जाऊन त्यांनी विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. करोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत असून रुग्णालयांमध्ये खाटा कमी पडत असल्याचे त्यांनी अनेकांना सांगितले. नागरिक औषधांचे निमित्त करून घराबाहेर पडत असून त्यासाठी आणखी कडक निर्बंध लावता येतील का, या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर विचार सुरू असल्याचे सांगितले.

अत्यावश्यक सेवेतील दुकानेही दुपारी एक वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, तर नागरिक घरातच थांबतील. औषधांसारखी अत्यावश्यक सेवाही काही ठरावीक रुग्णालयाच्या परिसरातच सुरू ठेवण्याचा विचार होत आहे. औरंगाबाद जिल्हा ड्रगिस्ट अ‍ॅण्ड असोसिएशनचे सरचिटणीस विनोद लव्हाडे यांनी सांगितले की, शुक्रवारी पालकमंत्र्यांसोबत सर्वच व्यापाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये किरकोळ औषधांची दुकाने सकाळी ९ ते १ व सायंकाळी ५ ते ८ या वेळात तर ठोक विक्रेते सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत खुली ठेवण्याबाबतची चर्चा झाली. रुग्णालयाजवळील औषधी दुकाने पूर्ण वेळ खुली राहतील. असाही चर्चेचा एक भाग होता. मात्र, अद्याप यावर अध्यादेश काढून निर्णय झालेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 1:53 am

Web Title: strict restrictions on essential service shops in aurangabad zws 70
Next Stories
1 औरंगाबादेत तब्बल १५ हजारांना रेमडेसिवीरची विक्री; तिघांना अटक
2 कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून दाम्प्त्याची आत्महत्या
3 प्राणवायूच्या सिलेंडरसाठी रुग्णवाहिकांनाही प्रतीक्षा
Just Now!
X