सुहास सरदेशमुख

परीक्षांचा घोळ आता ऑनलाइनपर्यंत पोहोचला आहे. मात्र, परीक्षा धोरणातील गुंता लक्षात घेता आपण या वर्षी ढकलपास होऊ शकतो, असे वाटून अनेक गळती झालेल्या आणि पुनर्परीक्षार्थीनी अर्ज केले असल्याचे दिसून येत आहे. पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमातून एखादा विषय राहिलेले किंवा दोन-तीन वर्षांपूर्वी शिक्षण सोडून दिलेल्या अनेकांनी परीक्षार्थी म्हणून अर्ज केले आहेत. करोनाकाळातील परीक्षा धोरणातील धरसोडवृत्तीमुळे ‘लाभार्थी’ होण्याची अनेकांची धडपड दिसून आल्याचे विद्यापीठातील परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे प्र-कुलगुरू जोगिंदरसिंग बिसेन यांनी या वृत्तास दुजोरा दिला.

‘सर्वसाधारणपणे सहा-सात वर्षांपूर्वी शिक्षण सोडून दिलेल्या काही जणांचे अर्ज वाढले असल्याचे दिसून आले आहे. कदाचित परीक्षा होणारच नाहीत असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नंतर परीक्षा घेण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, अनेकांनी पदवी मिळविण्याच्या हेतूने परीक्षेसाठी अर्ज केले असल्याचे दिसून आले आहे, असे जोगिंदरसिंग बिसेन म्हणाले. काही जणांना तर आठ वर्षांनंतर आपला विषय राहिला होता याची आठवण झाली. त्यांनीही अर्ज केले. ढकलपास होण्याची शक्यता दिसल्यानंतर वाढलेल्या या अर्जाची संख्याही लक्षणीय असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्येही या वर्षी ‘एटीकेटी’ (अलाऊ टू कीप टर्म) परीक्षार्थीची संख्या दरवर्षीपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले.

मात्र, अभियांत्रिकीसारख्या पदवीला प्रवेशानंतर आठ वर्षांपर्यंत परीक्षा देता येतात. त्यामुळे मार्चमध्ये नियमानुसारच पात्र परीक्षार्थीची यादी तयार केली असल्याचे परीक्षा नियंत्रक योगेश पाटील यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून त्यामध्ये दीड लाख विद्यार्थी परीक्षेस पात्र आहेत. कोणी विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, असे धोरण स्वीकारल्याचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी अलीकडेच जाहीर केले आहे. दरम्यान, ढकलपास का असेना पदवी मिळते आहे ना, या उद्देशाने अनेक जणांनी करोनाकाळात परीक्षार्थी म्हणून अर्ज केल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

परीक्षेची औपचारिकता

परीक्षा घेण्यास राज्य सरकारने एवढा उशीर लावला आहे की, गेल्या वर्षी शिकलेल्या अभ्यासक्रमातील अनेक बाबी आता पूर्णत: विसरल्या असल्याचे विद्यार्थी सांगतात. ऑनलाइन परीक्षेचा अनुभव आणि त्याची काठिण्यपातळी यावरही आता प्रश्नचिन्ह लावले जात आहे.

परीक्षेची औपचारिकता पूर्ण केली जाईल, असे चित्र निर्माण करता शिकलेल्या बाबींचे मूल्यांकन म्हणून परीक्षा व्हाव्यात असे तज्ज्ञ सांगत आहेत. पण सध्या पदवी मिळविण्याचा खटाटोप करण्यासाठी दूरध्वनी आणि आंतरजाल व्यवस्था यावरही लक्ष द्यावे लागणार आहे.

औरंगाबादसारख्या जिल्ह्य़ात काही भागांत हा प्रश्न गंभीर असल्याचे सांगण्यात येते. जवळच्या महाविद्यालयात तसेच एमकेसीएलच्या केंद्रातूनही परीक्षा देता येईल अशी व्यवस्था केली जाणार आहे. पण परीक्षा धोरणातील धरसोडवृत्तीत आपला लाभ होऊ शकेल अशी शक्यता दिसल्याने आठ वर्षांनी अर्ज करणारेही या वर्षी परीक्षेस बसणार आहेत. यामध्ये विवाहानंतर शिक्षण सोडून जाणाऱ्या काही मुलींचीही संख्या लक्षणीय असल्याचे सांगण्यात येतआहे.