औरंगाबाद-बीड महामार्गावरील शरदचंद्र पवार पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून यातील एक जण पसार झाला आहे. चिकलठाणा पोलिसांनी ही कारवाई केली. पॉलिटेक्निकच्या स्थापत्य शाखेच्या तिसऱ्या वर्षाच्या काँक्रिट टेक्नॉलॉजी विषयाची परीक्षा सुरु होती. परीक्षा केंद्रावर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सामूहिक कॉपीचा प्रकार सुरु होता.

मोबाईल कॅमेऱ्यात प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बाहेरुन प्रश्नांची उत्तरे मागवण्यात येत होती. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी कशी मिळाली? या प्रश्नामुळे कॉलेज प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात आहे.  काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील साई इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी शिवसेना नगरसेवकाच्या घरात रात्रीच्या वेळी पेपर तपासताना पकडण्यात आले होते. त्यानंतर महावितरणच्या लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेत हायटेक पद्धतीनं कॉपी करताना विद्यार्थ्यांना पकडण्यात आलं. त्यानंतर आज शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये कॉपीचा प्रकार उघडकीस आला. सातत्यानं समोर येणाऱ्या सामूहिक कॉपी प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.