अफगाणिस्तान व येमेनमधून अर्ज आणि प्रवेश अधिक

सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद :  युद्धजन्य व  अस्थिर देशातील विद्यार्थ्यांचा ओढा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शैक्षणिक अभ्यासक्रमाकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे. करोनाकाळात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या संकेतस्थळावर विद्यापीठाची नोंदणी झाल्यानंतर व त्यासाठी विद्यापीठातील प्रवेशित आंतराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहातील सोयीमध्ये झालेले चांगले बदल लक्षात घेता या वर्षी ७६ प्रवेश झाले असून अफगाणिस्तान आणि येमेनमधील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी केवळ तीन विद्यार्थी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या मार्फत प्रवेशित झाले होते. या वर्षी १०७ परदेशी विद्यार्थ्यांपैकी ७६ जणांचे प्रवेश झाले असून व्यवस्थापन शास्त्र, संगणक शास्त्र, गणित या विषयातील संशोधनासाठी परदेशी विद्यार्थी आकर्षित होत आहेत. या वर्षी २१ देशांतील विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. अर्जाची संख्या अफगाणिस्थान आणि येमेनमधून अधिक असली तरी विविध देशांतून शिक्षणासाठी येणारे अर्ज विद्यापीठ प्रशासनाचा मान उंचावणारी आहे.

विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचा कल चढत्या भाजणीचा असल्याचे विदेशी विद्यार्थी सहाय्यता कक्षाचे प्रमुख विकास कुमार यांनी सांगितले.  दरम्यान केवळ येमेन, अफगाणिस्तान या देशाबरोबरच आता युरोपीय देशातूनही विद्यार्थी प्रवेश आणि संशोधनसाठी यावेत यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मरावाडा विद्यापीठ प्रयत्न करीत असून अन्य शहराच्या मानाने औरंगाबाद शहराची ‘ गंगा- जमनी’ तहजीब आणि भोजनात असणारी काहीसे मिळते- जुळतेपणही या प्रवेशाला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या संकेतस्थळावर विद्यापीठास मार्च २०२१ मध्ये स्थान मिळाले. त्यामुळे जगभरातील वकिलातीच्या माध्यमातून येणाऱ्या प्रवेश मागणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचेही नाव घेण्यात आले. या पूर्वीही येमेन, सिरिया या देशातील विद्यार्थी संख्या असे पण या वर्षी अफगाणिस्थानमधील संख्याही लक्षणीय आहे. केवळ भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या शिष्यवृती योजनेतून नव्हे तर विद्यापीठाकडून परदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळावेत यासाठी प्रयत्न होत असून १६३ प्रवेश घेण्यास इच्छुकांचे अर्ज आले असून १५ जुलैपर्यंत त्यास मुदत असल्याने त्यानंतर छाननी करून प्रवेश वाढतील असे सांगण्यात येत आहे. परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशामुळे भाषा, सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढते त्यामुळे अशा शिष्यवृत्तींना प्रोत्साहन दिले जात आहे. गेल्या वर्षभरात देशात ३९५२ विद्यार्थ्यांना प्रवेश आणि शिष्यवृती देण्यात आल्याची आकडेवारी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या वार्षिक अंकात नमूद केलेली आहे.

अफगाणिस्तान, येमेन, सिरिया या देशातील विद्यार्थ्यांबरोबरच बांगलादेश,  इराक, सुडान, पॅलेस्टाईन,  तंझानिया,  झिम्बांवे, श्रीलंका, किनिया या देशातील विद्यार्थीही प्रवेश घेत असून अफागाणिस्तानमधील २६ आणि येमेनमधील २१ विद्यार्थ्यांंचे प्रवेश निश्चित झाले आहेत. पण आणखी विद्यापीठस्तरावरील प्रवेश प्रक्रिया बाकी असल्याने यात भर पडेल असे सांगण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषदेमुळे विद्यापीठातील विदेशी विद्यार्थ्यांचा ओढा वाढतो आहे. जवळपास २१ देशांतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी अर्ज केले होते. त्यातील विविध देशांतून प्रवेश व्हावेत असे प्रयत्न करण्यात आले. १०७ परिदेषदने शिफारस केलेल्या ७६ जणांना प्रवेश दिले आहेत. आणखी जवळपास १६३ अर्जाची छाननी बाकी आहे. विदेशी विद्यार्थ्यांंचा कला वाढतो आहे. शहर आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती तसेच अन्य अनेक घटक या प्रवेशांसाठी कारणीभूत असतात. परदेशी विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे, हे निश्चित.

– डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ