News Flash

सहकारमंत्री सुभाष देशमुख पुन्हा वादाच्या भोवऱ्यात!

प्रदेशाध्यक्ष दानवेही वादात

गुंतवणूकदारांच्या पैशांचा दुरुपयोग केल्याचा झालेला आरोप, विधानसभा निवडणुकीच्या काळात सापडलेली रोख रक्कम यापाठोपाठ नगरपालिका निवडणुकीच्या आधी संस्थेची सापडलेली ९१ लाख रुपयांची रोख रक्कम. सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि वाद हे जणू काही समीकरणच तयार झाले आहे.

देशमुख यांच्या संस्थेच्या ‘लोकमंगल’ मल्टिस्टेस्टची ९१ लाख ५० हजार रुपयांच्या नोटा उमरग्यामध्ये पकडल्यानंतर त्याची चौकशी केली जणार आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्याचा निर्णय निवडणूक विभागाने घेतला आहे. वेगवेगळय़ा आर्थिक घोटाळय़ांमध्ये सुभाष देशमुख यांचे नाव गेल्या सहा महिन्यांत चर्चेत आहे. या पूर्वी ‘लोकमंगल’ अ‍ॅग्रो या कंपनीने ४ हजार ७५१ गुंतवणूकदारांचे ७४ कोटी ८२ लाख रुपये नियमबाहय़पणे वापरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयात एक याचिका दाखल आहे तसेच किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. आर्थिक घोटाळय़ातील आरोप होऊनही सुभाष देशमुख यांना भाजपकडून पाठीशी घातले जात असल्याचा आरोप केला जातो. एका बाजूला काळय़ा पैशाच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहीम सुरू केली असताना संस्थेची रक्कम निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी आणल्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देशमुख यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.

देशमुख यांच्या वतीने खुलासा करताना ही रक्कम बँकेची होती, असा दावा करण्यात आला. पण नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर गाडीत ही रक्कम कशी आली, असा सवाल करण्यात येत आहे. देशमुख यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली आहे.

उमरगा येथे निवडणूक विभागच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या नोटांचा खुलासा नुकताच ‘लोकमंगल’ उद्योग समूहाने गुरुवारी रात्री केला. ही रक्कम मल्टिस्टेट बँकेची असल्याचे त्यांनी कबूल केले. पूर्वी ही रक्कम ऊसतोड कामगारांना द्यायची असल्याचे सांगण्यात येत होते. मल्टिस्टेट बँकांमधील व्यवहार तपासणीचे अधिकार केंद्रातील सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना असल्याने त्यांच्या अहवालानंतरच निवडणूक विभाग करणार आहे. राज्याच्या सहकारमंत्र्याच्या मल्टिस्टेटच्या विरोधात केंद्रातील अधिकारी अहवाल देतील काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे. सुभाष देशमुख हे मराठवाडय़ात नेहमीच वादात राहिले आहेत. सोलापूरमधील ‘लोकमंगल’ उद्योग समूहाचा विस्तार उस्मानाबाद जिल्हय़ात करताना लोहरा येथे साखर कारखाना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. गुंतवणूक उभी करताना शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना देता ‘इको’ बँकेकडून त्यांनी २० कोटी रुपये कर्ज घेण्यात आले. त्याविरोधात लातूर जिल्हय़ातील एका शेतकऱ्याने उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. नव्याने निवडणुकीच्या काळात ‘लोकमंगल’चा पैसा सापडल्याने सुभाष देशमुख अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळीही तुळजापूर येथे टोलनाक्यावर १२ लाख ७० हजार रुपयांची पकडण्यात आली होती.

प्रदेशाध्यक्ष दानवेही वादात

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या बरोबरोबरच नगरपालिका निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. जालना नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाची जागा मिळवूनही भाजपने तेथे उमेदवार उभा केला नाही. या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवत राजेंद्र बागडी यांनी उपोषणही केले. तसेच रावसाहेब दानवे यांच्या विरोधात त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडेही तक्रार दिली आहे. ती तक्रार मिळाल्याची पोचही त्यांच्याकडून बागडी यांना कळविण्यात आली आहे. अल्प उत्पन्न गटाच्या गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर आलिशान बंगला उभारल्याचा आरोप दानवे यांच्यावर पूर्वी झाला होता. तसेच अलीकडेच त्यांच्या नातेवाईकांना नियम डावलून पाच महाविद्यालये मंजूर करण्यात आल्याचेही प्रकरण चर्चेत आहे. या अनुषंगाने त्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. आता बागडी यांनीही रावसाहेब दानवे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

मल्टिस्टेटचे गणित

राज्यातील सर्वाधिक मल्टिस्टेट बँका मराठवाडय़ात आहेत. बीड जिल्हय़ातील माजलगाव आघाडीवर आहे. राज्यातील सहकार विभागातून होणाऱ्या चौकशीच्या फेऱ्यातून सहज सुटका करून घेता यावी, यासाठी मल्टिस्टेट सोयीचे असते. दोन-तीन राज्यांत शाखा असणाऱ्या या बँकांमधील गैरव्यवहाराची चौकशी केंद्राच्या अधिकाऱ्यांकडूनच होते. केंद्रातील सहकार विभागात पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने देशातील अनेक मल्टिस्टेट बँकांची तपासणीच होत नाही. माजलगावसारख्या छोटय़ा तालुक्यात ३० पेक्षा अधिक मल्टिस्टेट आहेत. अन्य राज्यांत दोन किंवा तीन शाखा उघडल्या की बँकांचा कारभार केंद्राच्या अखत्यारीत जातो. त्याचा फायदा राज्यातील मोठे पुढारी पद्धतशीरपणे घेत आहेत.

आज ना उद्या जिल्हा बँकांमधून मोठय़ा नोटा स्वीकारण्यास परवानगी मिळेल, म्हणून पकडण्यात आलेली ९१लाखाची रक्कम मुख्य शाखेत ठेवण्यात आली होती. ती रक्कम ठेवणे ही आमच्या कर्मचाऱ्यांची अनियमितता आहे. त्यासाठीच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. तसेच अनियमितेवरील शिक्षा स्वीकारण्यासही तयार आहोत.  सुभाष देशमुख, सहकारमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 1:24 am

Web Title: subhash deshmukh 2
Next Stories
1 प्रवाहाबाहेरील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होणार
2 कला संचालकांबरोबर विद्यार्थ्यांचा दीड तास वाद
3 विधानपरिषदेसाठी उद्या मतदान; राजूरकर व शिंदेंमध्ये चुरस
Just Now!
X