एकाच वेळी सत्तेचा उपभोग घेऊन विरोधी भूमिका घेणे शिवसेनेने आता सोडावे, असा उपरोधिक सल्ला देतानाच आघाडी सरकारच्या योजनाच नवीन नावे देऊन सध्याचे सरकार राबवत आहे आणि त्यातून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी येथे केली.
दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर आयोजित पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, माजी आमदार संजय वाघचौरे, चंद्रकांत दानवे आदी उपस्थित होते. मराठवाडय़ासह खान्देश आणि विदर्भात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. मात्र, यास तोंड देण्याबाबत सरकारकडून कोणतेही नियोजन सुरू असल्याचे दिसत नाही. दुष्काळी भागातील त्रस्त जनतेचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी मागेल त्यास काम देण्याचे धोरण सरकारने घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. ग्रामीण आरोग्य सेवेचे दर दुपटीने वाढविण्यात आले आहेत. तसेच एस.टी. प्रवासी सेवेचा अधिभार वाढविणे ही दुष्काळग्रस्तांची सरकारने चालविलेली चेष्टाच असल्याचा आरोप त्यांनी केला. फेब्रुवारीच्या अखेरीस पक्षाच्या पातळीवर संपूर्ण मराठवाडय़ाचा दौरा करण्यात येणार असून, कापूसभाव प्रश्नीही पक्ष आंदोलन करणार असल्याचे तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.